Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

घराच्या ओट्यावर झोपलेल्या व्यक्तीला पोलिस कर्मचाऱ्याच्या कारने चिरडले

घराच्या ओट्यावर झोपलेल्या व्यक्तीला पोलिस कर्मचाऱ्याच्या कारने चिरडले



कोरेगाव : कोरेगाव तालुक्यातील सर्कलवाडी येथे ग्रामदेवता श्री जानुबाई देवीच्या यात्रेत छबिन्याचा कार्यक्रम आटोपून घराच्या ओट्यावर झोपलेल्या व्यक्तीला पोलिसाच्या कारने चिरडले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. यामुळे गावात तणावाचे वातावरण तयार झाले होते. हा अपघात गुरुवार, दि. २४ रोजी मध्यरात्री सव्वा तीनच्या सुमारास झाला. रमेश लक्ष्मण संकपाळ (वय ४५) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

 
भुईंज पोलिस ठाण्यात कार्यरत असलेला कर्मचारी ज्ञानेश्वर राजे हा मध्यरात्री भुईंज येथून गावी वाघोली येथे भरधाव कारने निघाला होता. मध्यरात्री सव्वा तीनच्या सुमारास त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट रमेश सपकाळ यांच्या घराच्या ओट्यावर चढली. कारखाली चिरडल्याने रमेश संकपाळ यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच सर्कलवाडी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस कर्मचाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे एका निष्पाप व्यक्तीचा जीव गेल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

 

याप्रकरणी ग्रामस्थांनी वाठार पोलिस ठाण्यामध्ये ठिय्या मांडला. ऋतुराज कृष्णात संकपाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कार चालक ज्ञानेश्वर बाबुराव राजे या भुईंज पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाठार स्टेशन पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्रामस्थ आरोपी पोलीस कर्मचाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी करत आहेत. शुक्रवारी सकाळी संबंधित ज्ञानेश्वर राजे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार उदयसिंग जाधव तपास करत आहेत.

रास्ता रोको पावित्र्यात

सर्कलवाडी येथे निष्पाप रमेश संकपाळ यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेले ज्ञानेश्वर राजे हे वाघोली येथील रहिवासी आहेत. पोलिस दलात कार्यरत असल्याने त्यांना या अपघातातून वाचवण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. पिंपोडे बुद्रुक येथील ग्रामीण रुग्णालय आणि सर्कलवाडी येथे ग्रामस्थ संतप्त अवस्थेत होते. वेळप्रसंगी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. 




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.