ज्योती आदाटे : विजयनगर (म्हैसाळ) येथे अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम
सांगली : ज्या बाबासाहेबांनी आपल्याला ‘शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा’ हा मंत्र दिला, त्याच बाबासाहेबांच्या जयंतीला आपल्या बहुजन समाजातील मुले डॉल्बी लावून बेधुंद होऊन नाचत आहे. हा डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचा अपमान आहे. बाबासाहेब हे मिरवणुकीत नाचण्याचा विषय नाही, तर तो डोक्यात घेण्याचा विषय आहे, असे मत अंनिसच्या जिल्हा कार्याध्यक्षा ज्योती आदाटे यांनी व्यक्त केले.
म्हैसाळ येथील विजयनगर ग्रामस्थांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ‘अंधश्रद्धा निर्मूलन आणि प्रयोग प्रात्याक्षिकां’चा कार्यक्रम झाला. यावेळी त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, बहुजन समाजाची मुले अज्ञानी आणि अंधश्रद्ध राहिली पाहिजे, यासाठी काहीजण जाणिवपूर्वक प्रयत्न करीत आहेत. समाजामध्ये देवाच्या, धर्माच्या नावावर लोकांचे शोषण सुरू आहे. बुवा-बाबांच्या माध्यमातून लोकांना फसवले जात आहे. आणि अशा बुवांचे कार्यक्रमाला शासनच पाठिशी घालून त्यांना संरक्षण देते. चमत्काराचे जाहीर कार्यक्रम हे बुवा करीत असतात.
जादूटोणाविरोधी कायद्यानुसार हा गुन्हा असतानाही मंत्रीच त्यांना पाठिशी घालत आहेत. जादूटोणाविरोधी कायदा प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे. त्यासाठी अंनिसचे कार्यकर्ते प्रयत्न करीत आहेत. आजही अंगात येणे, भुताने झपाटणे असे अंधश्रद्ध प्रकाराला लोक बळी पडत असतात. हे थांबले पाहिजे. लोकांनी अशा अंधश्रद्धांना बळी पडू नये. गावात कुठेही अंधश्रद्धेचे प्रकार घडत असतील त्यांची माहिती अंनिसला कळवावी. म्हैसाळसारख्या गावात अंधश्रद्धेतून एखादा बुवा येतो आणि नऊ जणांना विष पाजून बळी घेतो. अशा घटना घडत असतात. अशा घटनांना लोकांनी बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी ज्योती आदाटे यांनी मंत्र शक्तीने नारळातून अग्नी निर्माण करणे, नारळातून करणी काढणे असे चमत्कारचे प्रयोग सादर केले. यावेळी अंनिसच्या संघटक प्रियंका तुपलोंडे यांनी कोंबडी संमोहित करणे, पेटता खापूर खाणे, टोकदार खिळ्यांच्या पाटावर झोपणे, तर सचिव गणेश कांबळे यांनी जिभेतून तार आरपार करणे, मंत्रशक्तीने वस्तू गोड करणे असे चमत्काराचे प्रयोग सादर करून दाखवले. समता सैनिक दलाचे अध्यक्ष अनिल कांबळे यांनी प्रास्ताविक केले, उपाध्यक्ष बसवेश्वर कांबळे यांनी स्वागत केले, प्रदीप बसर्गी आणि रेष्मा हिंमत कांबळे यांनी सहकार्य केले तसेच खजिनदार अभिजित कांबळे यांनी आभार मानले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.