छत्रपती संभाजीनगर : राज्यातील सर्व शाळांमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रियेचे ऑनलाइन कामकाज, आधार व अपार आयडी अद्ययावत करणे, स्कूल मॅपिंग आणि संचमान्यता दुरुस्ती यांसारखी महत्त्वाची कामे उन्हाळी सुटीतच पार पाडावी लागणार आहेत. यासाठी मुख्याध्यापक आणि शिक्षकेतर
कर्मचाऱ्यांनी नियमित शाळेत उपस्थित राहण्याचे स्पष्ट आदेश शिक्षण
संचालनालयाने दिले आहेत. त्यामुळे यंदा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील
मुख्याध्यापक, लिपिक व इतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उन्हाळी सुटीला मुकावे
लागणार आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. श्रीराम पानझाडे यांनी यासंदर्भात राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना परिपत्रकाद्वारे सूचना दिल्या आहेत. यानुसार, उन्हाळी सुटीत सर्व संबंधित शालेय कर्मचारी अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरळीत रितीने पार पाडण्यासाठी कार्यरत राहतील.
याशिवाय विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची पडताळणी व अद्ययावत नोंदणी करणे, अपार आयडी (स्थायी विद्यार्थी नोंदणी क्रमांक) अद्ययावत करणे, स्कूल मॅपिंग म्हणजेच शाळेच्या भौगोलिक माहितीचे अद्ययावतीकरण आणि संचमान्यतेशी संबंधित दुरुस्तीची कामेही पूर्ण करावी लागणार आहेत. राज्यातील अकरावी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक शिक्षण विभागाने जाहीर केले असून, त्यानुसार वेळेत नोंदणी, दस्तऐवज पडताळणी व प्रवेश प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी शाळेतील कर्मचाऱ्यांची उपस्थिती अत्यावश्यक असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. ऑनलाइन प्रणालीतून कामकाज करताना कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास संबंधित विभागीय कार्यालयाशी तत्काळ संपर्क साधावा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
सुट्यांचे नियोजन फिसकटले
दरवर्षी उन्हाळी सुटीत मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी गावाकडे, तसेच पर्यटनस्थळी जाण्याचे नियोजन करतात. मात्र, यंदा सुरवातीला अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसोबत विविध शालेय कामांची गर्दी असल्याने यावर्षी सुटीच्या काळातच कामे पार पाडावी लागणार आहेत. त्यामुळे अनेकांनी सुट्यांमध्ये फिरण्याचे केलेले नियोजन बिघडले आहे. दीर्घकाळ सलग कामानंतर उन्हाळी विश्रांतीची गरज असताना प्रशासनाने कामाचे ओझे वाढवल्याने संबंधितांत नाराजीचा सूर उमटत आहे.
सुटीत करावयाची कामे
अकरावी प्रवेश प्रक्रियेची ऑनलाइन नोंदणी, पडताळणीविद्यार्थ्यांचे आधार क्रमांक पडताळणी, अद्ययावत करणेअपार (स्थायी विद्यार्थी नोंदणी क्रमांक) माहिती सुधारित करणेशाळेचे स्कूल मॅपिंग आणि भूगोलविषयक माहिती अद्ययावत करणेसंचमान्यता दुरुस्तीची कामे पूर्ण करणेविविध शैक्षणिक व प्रशासकीय अहवालांची पूर्तता व अपलोडिंग
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.