खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून मनमानी भाडेवाढ
जाधववाडी : उन्हाळ्याच्या सुट्टीत पिंपरी-चिंचवडमधून मूळ गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी असते. त्यामुळे या काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसह खासगी प्रवासी वाहतुकीला मोठी गर्दी असते. त्याचाच गैरफायदा घेऊन खासगी प्रवासी बसमालकांनी प्रवाशांची लूट सुरू केली आहे. बसमालकांनी सिझनच्या नावाखाली दुप्पट भाडे आकारण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, जास्त भाडे आकारणी करणाऱ्या बसचालक, मालक आणि कंपन्यांविरुद्ध कारवाई करण्यात प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) आखडता हात घेतल्याने प्रवाशांची सरकारमान्य लूट सुरू आहे.
पिंपरी-चिंचवडहून दररोज सुमारे पाचशेहून अधिक खासगी बस राज्याच्या विविध भागांत जातात. या व्यतिरिक्त मुंबईहून येणाऱ्या पाचशे खासगी बस पुण्यातून पुढे मार्गस्थ होतात. शहरातून मूळगावी जाणाऱ्या प्रवाशांमध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातील प्रवाशांची संख्या अधिक असते. मुख्यत्वे दिवाळी आणि उन्हाळी सुट्टीच्या काळात ही संख्या खूप मोठी असते. प्रवाशांची संख्या वाढण्याच्या काळात बसचे भाडे वाढविण्याचे प्रकार केले जातात. सिझनच्या नावाखाली आता खासगी बसचालकांनी भाडे दुपटीहून अधिक वाढविले आहे. त्यामुळे, प्रवाशांना मोठा भुर्दंड बसत आहे.
'आरटीओ'ने दर निश्चित करण्याची मागणी
मनमानी भाडेवाढीच्या विरोधात अनेक संघटनांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे, की खासगी बसचे दर 'आरटीओ'ने निश्चित करून द्यावेत. ते नियमानुसार एसटीच्या तिकिटाच्या दीडपट भाडे आकारत आहेत. हे दीडपट दर केवळ उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत असतात. 'आरटीओ'ने त्यांना दर निश्चित करून दिल्यास त्याचे पालन त्यांनी करावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बसमालकांवर आरटीओने कारवाई करावी.
राज्य सरकारच्या कमाल दराकडे दुर्लक्ष खासगी प्रवासी बसला एसटी बसच्या प्रतिकिलोमीटर भाडेदाच्या दीडपट भाडे आकारता येते. याबाबतचे कमाल भाडे सरकारने २७ एप्रिल २०१८ रोजी निश्चित केले आहेत. काही खासगी प्रवासी बस सणासुदीच्या व गर्दीच्या हंगामामध्ये प्रवाशांकडून मनमानी भाडे आकारत असल्याच्या तक्रारी येत आहेत. मात्र, जास्त भाडे आकारणाऱ्या खासगी बसवर आरटीओ आणि वाहतूक पोलिसांकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही.
उन्हाळी सुट्टीच्या पाश्र्वभूमीवर रेल्वेचे बुकिंग फुल्ल झाले असून एसटी महामंडळाकडे पण खूप मोठी गर्दी असते. त्यामुळे प्रवासी नागरिकांना ट्रॅव्हल्स हाच पर्याय शिल्लक असतो. मात्र. ट्रॅव्हल्स चालकांकडून या काळात मोठ्या प्रमाणात तिकीट दर वाढवले जातात. तसेच काही ठिकाणी तिकीट दरामध्ये दुप्पट, तिप्पट वाढ केली जाते.
- गणेश गायकवाड, प्रवासी
उन्हाळी सुट्टीमुळे प्रवासी खासगी बसची वाहतूक पथकामार्फत तपासणी करावी. तिकीट बुकिंग काउंटरवरदेखील जाऊन तपासणी व्हावी व गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जावी. भाडेवाढीमुळे प्रवाशांना विनाकारण भुर्दंड सहन करावा लागत आहे. या त्रासापासून सुटका होऊन नागरिकांची होणारी लूटमार थांबावी.
– महेश राणे, प्रवासी
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.