गोंदिया: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) राज्यभरात धडक कारवाई सुरू केली असून, सरकारी अधिकारी आणि कर्मचारी रंगेहाथ पकडले जात आहेत. नुकतेच एका वाहतूक पोलिस शिपायाचा 50 रुपयांची लाच घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई झाली होती.
आता नागपूर ग्रामीणच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) मोटार वाहन निरीक्षक योगेश गोविंद खैरनार (46, रा. नागपूर) याच्यासह नरेंद्र मोहनलाल गडपायले (63, रा. गोंदिया) आणि आश्लेष विनायक पाचपोर (45, रा. अमरावती) या तिघांना नाशिक एसीबी पथकाने अटक केली. ही कारवाई नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्ग 6 वरील देवरी तालुक्यातील शिरपूर सीमा तपासणी नाक्यावर झाली.
काय आहे प्रकरण?
तक्रारदाराच्या मालवाहू ट्रेलरला भंडारा-देवरी मार्गे रायपूरला जाताना शिरपूर नाक्यावर थांबवण्यात आले. येथे खासगी व्यक्ती नरेंद्र गडपायले याने एंट्रीच्या नावाखाली 500 रुपयांची मागणी केली आणि ती रक्कम आश्लेष पाचपोरमार्फत मोटार निरीक्षक खैरनार याच्याकडे पोहोचवली. एसीबीच्या चौकशीत खैरनार याने या दोन खासगी व्यक्तींना बेकायदेशीरपणे नाक्यावर नेमले असून, त्यांच्यामार्फत मुंबई-कोलकाता महामार्गावरील ट्रक चालकांकडून लाच वसूल केली जात असल्याचे उघड झाले.
कारवाई आणि खळबळ
एसीबीने
सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले असून, देवरी पोलिस ठाण्यात गुन्हा
नोंदवला आहे. या प्रकरणाने आरटीओ कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून बोगस
नेमणुका करून लाचखोरीचा प्रकार पुन्हा एकदा समोर आल्याने परिसरात खळबळ
उडाली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.