छगन भुजबळ मंत्रिपदाची शपथ घेणार, आज सकाळी 10 वाजताचा मुहूर्त; धनंजय मुंडेंकडील खातं भुजबळांना मिळणार
मुंबई : राज्याच्या राजकारणासाठी आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईच्या राजभवनात मंगळवारी सकाळी शपथविधीचा कार्यक्रम होणार आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे राज्याच्या मंत्रिपदाची शपथ घेणार असून मंगळवारी सकाळी 10 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान न
मिळाल्याने छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा होती. आता त्यांना मंत्रिपद
देऊन नाराजी दूर करण्यात येत आहे. मंगळवारी राजभवनात 50 लोकांच्या
उपस्थितीत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. त्यासाठी सोमवार
रात्रीपासूनच तयारी सुरू करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी 9 वाजता
राजभवनामध्ये हजर राहण्याच्या सूचना अनेकांना देण्यात आल्या आहेत.
धनंजय मुंडेंचे खाते छगन भुजबळांकडे
बीडमधील
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे
यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा
खात्याची जबाबदारी होती. आता तेच खातं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळाना
देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
भुजबळांनी नाराजी दूर होणार?
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असूनही महायुतीच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळांना स्थान मिळालं नव्हतं. त्यामुळे भुजबळ नाराज असल्याची चर्चा होती. मंत्रिपद न मिळाल्याची खंत त्यांनी अनेकदा व्यक्त केली होती. तसेच त्यांनी अजित पवारांवरही टीका केल्याचं दिसून आलं. भुजबळांची हीच नाराजी आता दूर करण्यात येणार आहे. अजित पवारांनी मंत्रिपदावरून डावलल्यानंतर छगन भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचीही भेट घेतली होती. त्यावेळी फडणवीसांनी भुजबळांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला होता.आधीच्या सरकारमध्ये छगन भुजबळ यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा हे खातं होतं. नंतर ते खातं धनंजय मुंडे यांच्याकडे गेलं. आता तेच खातं पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांना मिळण्याची शक्यता आहे. छगन भुजबळांच्या या शपथविधीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत.
ओबीसी मतदारांना खुश करण्यासाठी निर्णय
आगामी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी मतदार आपल्यासोबत
राहण्यासाठी महायुतीकडून आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने ही खेळी
खेळल्याची चर्चा आहे. धनंजय मुंडे यांच्या रुपाने ओबीसी नेतृत्व या आधी
मंत्रिमंडळात होतं. पण त्यांच्या राजीनाम्यानंतर आता छगन भुजबळांच्या
रुपाने ओबीसी नेता मंत्रिमंडळात असणार आहे. छगन भुजबळांनी त्यांच्या
नाशिकमधील काही निवडक कार्यकर्त्यांना सोमवारी रात्रीच मुंबईत बोलावून
घेतलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.