'उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार' या बातम्यांनी काही दिवस महाराष्ट्राचे राजकीय मनोरंजन झाले. त्यातली हवा निघत नाही तोच 'शरद पवार-अजित पवार एकत्र येणार' या चर्चेला अचानक वेग आला. शेवटी अजित पवार यांनी जाहीर केले की 'तसे काहीही नाही, आम्ही एकत्र वगैरे येणार नाही.' त्यामुळे तूर्तास पवार एकत्रीकरणाची चर्चा थांबायला हरकत नाही.
राज्याचे सध्याचे राजकारण, भविष्यातील घडामोडी, फाटाफूट, जोडतोड याचे बव्हंशी निर्णय हे दिल्लीत होतील. भाजपची अख्खी हायकमांड दिल्लीत आहे. एकनाथ शिंदे, अजित पवार हे त्यांच्या-त्यांच्या पक्षाचे हायकमांड असल्याचे दिसते; पण बरेचदा दिसते तसे नसते. हे दोघे हायकमांड आहेत असे मानले तरी दिल्लीची सुपरकमांड त्यांच्यावर आहेच. माहिती अशी आहे की, अजित पवार भाजपसोबत गेले तेव्हाच, 'पुढे मागे तुम्ही दोघे (अजित पवार - शरद पवार) एकत्र याल आणि वेगळेच राजकारण दिसेल, असे काही होऊ देऊ नका', असे अजितदादांना भाजपच्या दिल्लीतील श्रेष्ठींनी सहा महिन्यांपूर्वीच बजावले होते. त्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली. हे लक्षात घेता पवार-पवार एकत्र येणे दोघांच्याही हाती नाही, तर ते प्रत्यक्षात दिल्लीच्या हाती आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका वगैरे विषय दिल्लीसाठी तेवढे महत्त्वाचे नसतात. लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून दिल्लीत समीकरणांची जुळवाजुळव होत असते. या निवडणुकीला आणखी चार वर्षे बाकी आहेत, त्यामुळे सध्या दिल्लीला कसली घाई नाही. इतक्या सहजासहजी पवार एकत्रीकरणाला दिल्ली मान्यता देणार नाही. शरद पवार यांना सर्वार्थाने थकविले जाईल. पवारांनी अनेकांना थकविले, आता त्याबाबत त्यांची परीक्षा आहे. सोबतची माणसे टिकविण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. एक थिअरी सुरुवातीपासून फिरत होती की 'दोघांचे वेगळे होणे हेच मुळात एक नाटक आहे, सोयीनुसार वेगळे व्हायचे आणि सोयीनुसार एकत्र यायचे हे आधीच ठरलेले आहे.'आज दोन पवार एकत्र आले, तर या थिअरीवर शिक्कामोर्तब होईल. भाजपला हे नकोच आहे. पवारांची एकत्रित ताकद भाजप का वाढू देईल? अजित पवारांनी जे स्पष्टीकरण दिले ते भाजपच्याच सांगण्यावरून असाही एक अंदाज आहे. अजित पवारांकडे आज ताकद आहे, शरद पवारांकडे डावपेचांचे कौशल्य तर आहेच; अशावेळी पुतण्याची ताकद आणि काकांचे डावपेच कौशल्य एकत्र येणे भाजपला कसे आवडेल?
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.