Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

रजा हवी तर आठवड्याच्या कामाचा अहवाल सादर करा

रजा हवी तर आठवड्याच्या कामाचा अहवाल सादर करा
 

बीड: जिल्हा पोलिस दलात शिस्तीसह कामाचा वेग वाढविण्यासाठी पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी आता रजेचा अर्ज करताना आठवडाभरातील कामाचा आढावा सोबत जोडण्याचा निर्णय घेतला आहे. मागील कामाचा अहवाल पाहूनच रजेचा निर्णय घेतला जाणार आहे.  अधिकारी, कर्मचारी परस्पर ऑनलाईन यंत्रणेत रजेचा अर्ज टाकून रजेवर निघून जातात. अनेकदा प्रमुख घटनांचा तपास, कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित झालेला असतानाही संबंधित अधिकरी व कर्मचारी रजेवर निघून गेलेले असतात. यावर आता पोलिस अधीक्षकांनी कामाच्या आढाव्याचा नियम काढला आहे.

आठवडाभरात काय काम केले याचा अहवाल जोडून देणे आवश्यक असल्याचे आणि त्याचे मूल्यमापन करूनच रजा मंजुरीचा निर्णय होणार आहे. पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी बीड जिल्हा पोलिस दलाची प्रतिमा बदलण्यासाठी नवनव्या संकल्पना मांडल्या आहेत. आता पोलिस दलातील शिस्तीसाठी हा प्रयोग हाती घेण्यात आला आहे. पोलिस खात्यातील अनेकजण व्हॉट्सअपवर रजा टाकून रजा मंजुरीची वाट न पाहताही रजेवर जात असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे मनासारखे होत नसेल तर किंवा जवळच्या एखाद्यावरील कारवाई टाळायची असेल तरी अधिकारी रजेवर निघून जातात.


त्यामुळे रजा घेण्यासाठी कॉवत यांनी रजेच्या अर्जासोबत मागच्या आठवड्यातील कामाचा गोषवारा सक्तीचा केला आहे. त्या गोषवाऱ्याचे मूल्यमापन करूनच कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या रजेचा निर्णय होणार असल्याचे पोलीस अधीक्षकांनी म्हटले आहे. यामुळे रजेच्या बाबतीतल्या मनमानीला निश्चितपणे चाप बसणार आहे. महत्वाची घटना, कायदा सुव्यवस्थेच्या काळात पोलिसांची जबाबदारी असते. त्यामुळे रजा मंजुरीपूर्वी कामाचे मुल्यमापन केले जाणार आहे. एखाद्या कर्मचाऱ्याचे अत्यावश्‍यक, सुख - दु:खाचे काम असेल तरच मुल्यमापनाशिवाय देखील रजा दिली जाईल.
- नवनीत कॉवत, पोलिस अधीक्षक, बीड
 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.