परळीत शुक्रवारी संध्याकाळी शिवराज दिवटे या तरुणाचे अपहरण करुन त्याला मारहाण करण्यात आली होती. यामध्ये शिवराज दिवटे जखमी झाला होता. या प्रकरणात बीड पोलिसांनी आरोपींपैकी काहींना ताब्यात घेतले होते. शिवराज दिवटे याला समाधान मुंडे आणि
त्याच्या टोळक्याने मारहाण केली होती. या टोळक्यामध्ये जेमतेम 18 वर्षे वय
असलेल्या अनेक मुलांचा समावेश होता. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात होती.
बीड जिल्हा आणि परळीतील या लहान मुलांमध्येही भाईगिरी आणि गुंडगिरीची नशा
किती भिनली आहे, याचा पुरावा समोर आला आहे. शिवराज दिवटे याला मारहाण
करणाऱ्या टोळक्याचा म्होरक्या समाधान मुंडे याची एक ऑडिओ क्लीप सध्या सोशल
मीडियावर व्हायरल होत आहे.
या ऑडिओ क्लीपची 'एबीपी माझा'ने खातरजमा केलेली नाही. या क्लीपमध्ये समाधान मुंडे हा सुहास साबळे या तरुणाला धमकावताना ऐकायला मिळत आहे. तू माझ्या भावाला, रोहित मुंडेलाही एकदा राँग बोलला होता. तुझी ### भरलेय का. आता तू दोन शब्द पुन्हा राँग बोललास. तुझे तीन शब्द राँग झालेत. नाय याच्या %$वर तीन कोयते घातले तर बघ, असे समाधान मुंडे सुहास साबळे याला धमकावताना ऑडिओ क्लीपमध्ये ऐकायला मिळत आहे. समाधान मुंडे आणि दहा ते बारा जणांच्या टोळक्याने शिवराज दिवटे या तरुणाला काल परळीतून अपहरण करून रत्नेश्वर मंदिर परिसरात नेऊन लाठ्या, काठ्या आणि बेल्टने अमानुष मारहाण केली होती. तत्पूर्वी त्याने सुरेश साबळे आणि भागवत साबळे यांना परळी शहरात समाधान मुंडे व तुकाराम गिरी यांनी मारहाण केली होती. भागवत साबळे यांना कत्ती लागली होती. याप्रकरणी अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हाही दाखल झाला होता. यातीलच मारहाण करणारा मुख्य आरोपी समाधान मुंडे याने आणखी एक तरुण सुहास साबळे याला फोनवरून कोयत्याने मारण्याची धमकी दिली.
परत आल्यावर गल्लीतून त्याची दिंडी मी स्वत: काढणार, समाधान मुंडेंची धमकी
सध्या
सोशल मीडियावर समाधान मुंडे याच्या दोन ऑडिओ क्लीप व्हायरल होता आहेत.
यापैकी एका ऑडिओ क्लीपमध्ये तो कोणाला तरी सांगत आहे की, सुहास साबळेला
त्याच्या घरात घुसून मारणार. त्याच्या गल्लीतून मी स्वत: त्याची दिंडी
काढणार. मी स्वत: म्हणजे आमची 15-20 पोरं आहेत. ज्यादिवशी परत येईन,
त्यादिवशी दिंडी काढेन. फक्त तू नको मध्ये पडू, आपले चांगले संबंध आहेत. मी
तुझ्या चौकात पाच वाजता येईन, असे समाधान मुंडे एका व्यक्तीला सांगत आहे.
परळीतील मारहाण प्रकरणात पाच जणांना 20 मेपर्यंत पोलीस कोठडी
बीडच्या परळी शहराजवळ असलेल्या टोकवाडी शिवारात शिवराज दिवटे याला मारहाण करण्यात आली होती या प्रकरणातील आरोपी समाधान मुंडे,सचिन मुंडे,रोहन वाघुळकर, आदित्य गित्ते तुकाराम गिरी यांना अटक करत परळी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांना न्यायालयाने 20 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली तर दुसरीकडे दोन अल्पवयीन आरोपींची रवानगी निरीक्षण गृहामध्ये करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणात प्रशांत कांबळे, सुरज मुंडे, रोहित मुंडे व स्वराज गित्ते हे अद्यापही फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.