राज्यात बीड जिल्हा सध्या फक्त येथील गुन्हेगारी कृत्यांनीच चर्चेत आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा निर्घृण खून करण्यात आला होता. या प्रकरणाची देशात चर्चा झाली. यानंतरही जिल्ह्यात गुन्हेगारीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यानंतर नुकतीच एक घटना उघडकीस आली. दहा ते बारा जणांनी शिवराज हनुमान दिवटे या युवकाचे अपहरण करून त्याला लाठ्याकाठ्या आणि बेल्टने मारहाण केली. या घटनेवर सर्वत्र संताप व्यक्त होत असतानाच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठी मागणी केली आहे. बीडमध्ये ऑपरेशन सिंदूर राबवा अशी मागणी त्यांनी केला आहे.
दमानिया यांनी त्यांच्या एक्स हँडलवरून एक पोस्ट केली आहे. यात दमानिया म्हणतात, बीडचं परळी म्हणजे आता दहशतीचा अड्डा झाला आहे. या प्रकाराला अतिशय गांभीर्याने घ्यायला हवे. काल जो मारहाणीचा प्रकार घडला त्यातील सगळी मुलं ही लहान वयाची होती. या सगळ्या मुलांची मारहाण पाहून दुसऱ्या एका व्हिडिओत ज्याला मारलं त्याला ज्या पद्धतीने पाया पडायला लावलं होतं. ते पाहून असं वाटतं की ही एख रिव्हेंज
केस (बदला घेण्याच्या उद्देशाने केलेली कार्यवाही) होती. या सगळ्या गोष्टी
आता भलत्याच दिशेने जात आहेत. जसं आपण ऑपरेशन सिंदूर सीमेवर केलं होतं तसंच
आता बीडमध्ये करण्याची गरज आहे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली
दमानिया यांनी केली आहे.
कोणाला झाली मारहाण, वाद काय..
परळीत काल रिलायन्स पेट्रोल पंपासमोरून काही जणांनी शिवराज हनुमान दिवटे या तरुणाला उचलले. नंतर त्याला गावातील रत्नेश्वर मंदिराच्या परिसरात घेऊन आले. येथे त्याला लाठ्याकाठ्या आणि बेल्टने बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत शिवराज दिवटे गंभीर जखमी झाला आहे. त्याला अंबाजोगाईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. येथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.परळीतील जलालपूर येथे एक कार्यक्रम होता. या कार्यक्रमात झालेल्या वादाचा राग मनात धरुन दहा ते बारा जणांच्या टोळक्याने आधी तरुणाचे अपहरण केले. नंतर त्याला निर्जनस्थळी नेऊन अमानुष मारहाण करण्यात आली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओवर प्रचंड संताप व्यक्त होत आहे. मारहाण करणाऱ्या माथेफिरुंना लवकरात लवकर अटक करावी. त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.