कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
भोपाळ: पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानातील दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करण्यात आले. त्यानंतर या ऑपरेशनची माहिती जाहीर करणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत भाजपाच्या मंत्र्याने केलेल्या वादग्रस्त विधानामुळे पक्षाची डोकेदुखी वाढली आहे. काँग्रेस नेत्याने भाजपा मंत्र्याचा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर सोशल मीडियात
संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे वादग्रस्त विधान करणारे मंत्री
विजय शाह यांना भाजपा कार्यालयाने तात्काळ बोलावून घेतले. या प्रकरणी
त्यांनी माफी मागितली आहे. वरिष्ठांनी शाह यांना फटकारल्यानंतर ते पळत पळत
पक्षाच्या कार्यालयात पोहचले.
माध्यमांच्या कॅमेऱ्यापासून वाचण्यासाठी
मंत्री विजय शाह हे धावतच भाजपा प्रदेश कार्यालयात गेले. शाह यांच्या
विधानाची दखल वरिष्ठ पातळीवर घेण्यात आली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष
जे.पी. नड्डा यांनीही याबाबत प्रदेश कार्यालयाकडे अहवाल मागितला आहे.
त्यानंतर मध्य प्रदेश संघटन मंत्री हितानंद शर्मा आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष
वी.डी शर्मा यांनी मंत्री शाह यांना चांगलेच फटकारले. शाह यांनी पक्षाच्या
नेतृत्वाकडे माफी मागितली. त्यासोबत माध्यमांसमोर येऊन मी बहीण सोफियाची
हजारवेळा माफी मागतो असं म्हटलं आहे.
काय आहे प्रकरण?
मध्य प्रदेशातील मंत्री विजय शाह यांनी सोमवारी इंदूर येथील एका कार्यक्रमात हजेरी लावली. त्यावेळी शाह यांनी दहशतवाद्यांची बहीण म्हणून कर्नल सोफिया कुरेशी यांचा उल्लेख केला. या घटनेचा व्हिडिओ मंगळवारी व्हायरल झाला. त्यानंतर विरोधी पक्षासह सोशल मिडिया युजरनेही भाजपा नेत्याची खरडपट्टी केली. मात्र शाह यांच्या विधानामुळे भाजपाची गोची झाली.व्हायरल व्हिडिओनंतर त्याची गंभीर दखल भाजपाच्या वरिष्ठांनी घेतली. त्यानंतर शाह यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माध्यमांना सांगितले की, माझ्या पूर्ण कुटुंबाला सैन्याची पार्श्वभूमी आहे. कारगिलपासून अनेक ठिकाणी आमच्या घरातील लोक शहीद झालेत. मी स्वप्नातही सैनिकांचा अपमान करण्याचा विचार करू शकत नाही. तरीही माझ्याकडून अनावधानाने कुणाचा, कुठल्या समाजाचा अपमान झाला असेल तर दहा वेळा माफी मागण्यास तयार आहे. बोलण्याच्या ओघात माझ्या तोंडून चुकीचे विधान झाले अशी कबुली त्यांनी दिली. मात्र पक्षाकडून मला इतर कारणासाठी बोलावले होते असा दावा शाह यांनी केला. मंत्री विजय शाह यांच्या विधानामुळे पक्षाची प्रतिमा खराब झाली. त्यामुळे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी भाजपा नेत्यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्या कुटुंबाची भेट घेतली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.