जात जनगणना अशक्य...; सुप्रीम कोर्टातील शपथपत्राचा उल्लेख करत प्रकाश आंबेडकरांचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
केंद्र सरकारने बुधवारी (ता.30) अचानक जात जनगणना करण्याचा मोठा निर्णय जाहीर केला. सरकारच्या या निर्णयाचं विरोधकांनी स्वागत केलं आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या निर्णयाचं स्वागत करताना सरकार ही जनगणना कधी करणार याची वेळ देखील जाहीर करावी अशी मागणी केली आहे.
एकीकडे विरोधक या निर्णयाचं स्वागत करत आहेत, तर दुसरीकडे बिहार विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून सरकारने ही घोषणा केल्याची टीकाही केली जात आहे. अशातच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी तर ही जनगणना सरकार कशी करणार? कारण ही जात जनगणना करणं अशक्य असल्याचं सरकारनेच सुप्रीम कोर्टात दिलेल्या शपथपत्र नमुद केल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे सरकारची भूमिका ही दुटप्पी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आपल्या एक्सवर एक व्हिडिओ शेअर करत जातनिहाय जनगणनेवर काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
तर जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेण्यात आलेला नाही ना? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं की, "केंद्र सरकारने जात जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. पण हा एक दिखावा असून जनतेच्या डोळ्यात धुळफेक कऱण्याचा प्रयत्न आहे.
कारण सरकारने अद्याप जनगणना कधी करणार हे सांगितलेलं नाही. उलट, सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात केंद्र सरकारने जातीय जनगणना करणे शक्य नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारची ही भूमिका दुटप्पी आणि संभ्रम निर्माण करणारी वाटते. शिवाय केंद्र सरकार जाणूनबुजून जनगणना पुढे ढकलत आहे.जर जनगणनाच झाली नाही तर जातींची जनगणना कशी शक्य आहे? सरकारने याचं उत्तर द्यावं." तसेच, जम्मू आणि काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी घटनेमुळे देशभर संताप व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीत जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला नाही ना? असं म्हणत सरकारच्या निर्णयावर त्यांनी शंका उपस्थित केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.