Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वैद्यकीय रजेच्या नावे परदेशी सहल महागात; नाशिकचे सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त निलंबित

वैद्यकीय रजेच्या नावे परदेशी सहल महागात; नाशिकचे सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त निलंबित
 

मुंबई : आजारपणाच्या नावाखाली वैद्यकीय रजा घेऊन परदेशात सहलीसाठी गेलेले नाशिकचे सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त प्र. दा. जगताप यांना निलंबित करण्यात आले आहे. आदेशाचे पालन न करणे, कर्तव्यात कसूर करणे, कर्तव्यावर गैरहजर असणे, वरिष्ठांची दिशाभूल करणे आणि देशात युद्धजन्य परिस्थिती असताना आजारपणाच्या नावाखाली परदेशात सहलीसाठी गेल्याच्या कारणास्तव जगताप यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास विभागाने देशातील युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेऊन अधिकारी आणि कर्मचारी यांच्या रजा रद्द केल्या होत्या. तथापि शासकीय कामाकरिता नाशिकचे सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त जगताप यांनी इगतपुरी न्यायालयात असताना आपल्या रक्तातील साखर कमी झाल्यामुळे अशक्तपणा येऊन चक्कर आली. शुद्धीवर आल्यानंतर दवाखान्यात जावे लागल्याने नाशिक येथील प्रादेशिक कार्यालयाकडे अर्धा दिवस किरकोळ रजेचा अर्ज सादर करून तब्येत बरी नसल्याचे भासवले होते. 
 
मात्र, प्रत्यक्षात ते परदेशात गेल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नीतेश राणे यांनी कारवाईचा बडगा उचलत सहाय्यक आयुक्त जगताप यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार त्यांच्यावर मंगळवारी निलंबन कारवाई करण्यात आली. निलंबन आदेशात जगताप निलंबित असेपर्यंत मत्स्य व्यवसाय नागपूर प्रादेशिक उपायुक्त यांच्या लेखी पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडणार नाहीत. तसेच त्यांचे मुख्यालय चंद्रपूर राहील, असेही स्पष्टपणे बजावण्यात आले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.