Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विजय कुलकर्णी यांना फिनलंड येथे 'क्रिएटिव एक्सलन्स इन मॅथ्स टीचिंग' पुरस्काराने सन्मानित

विजय कुलकर्णी यांना फिनलंड येथे 'क्रिएटिव एक्सलन्स इन मॅथ्स टीचिंग' पुरस्काराने सन्मानित
 

पारिजात अकॅडमीचे संचालक आणि वैदिक गणिताचे प्रशिक्षक श्री. विजय कुलकर्णी यांना फिनलंड सरकारच्या ‘कौन्सिल फॉर क्रिएटिव एज्युकेशन’ या संस्थेतर्फे 'क्रिएटिव एक्सलन्स इन मॅथ्स टीचिंग' या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. वैदिक गणित क्षेत्रात गेल्या १५ वर्षांपासून केलेल्या कार्याची दखल घेऊन, १२ व्या आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांना हा सन्मान देण्यात आला.

हा पुरस्कार ‘युरोपियन आंतरराष्ट्रीय युनिव्हर्सिटी’चे संस्थापक आणि जनरल डायरेक्टर डॉ. एडवर्ड रॉय कृष्णन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी श्री. विजय कुलकर्णी यांना सन्मानपत्र आणि गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या परिषदेत अमेरिका, इंग्लंड, थायलंड, मलेशिया, केनिया, इस्रायल, स्पेन, भारत आदी २५ पेक्षा अधिक देशांतील शिक्षणतज्ज्ञ सहभागी झाले होते. या व्यासपीठावर विजय कुलकर्णी यांनी ‘वैदिक गणिताचे जागतिक महत्त्व’ या विषयावर प्रभावी सादरीकरण केले. त्यांच्या अभ्यासपूर्ण आणि अनुभवाधारित सादरीकरणास सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला. 

या सन्मानाबद्दल विजय कुलकर्णी म्हणाले, “हे यश माझ्या आई-वडिलांच्या आशीर्वादामुळे आणि सद्गुरूंच्या कृपेने मिळाले आहे.” त्यांनी वैदिक गणिताच्या प्रसारासाठी अधिक ऊर्जा आणि नवकल्पनांसह काम करण्याचा संकल्पही व्यक्त केला. “भारतीय संस्कृतीचा अनमोल ठेवा असलेले वैदिक गणित आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवता आले याचा अभिमान वाटतो,” असे त्यांनी सांगितले.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.