वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील संतापाची आग अजूनही लोकांच्या मनात धगधगत असताना नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. नाशिकच्या गंगापूर परिसरात एका विवाहितेने आत्महत्या केली आहे. सासरच्या जाचाला कंटाळून तिने घरातच
गळफास घेऊन आयुष्य संपवलं आहे. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर
गंगापूर पोलीस ठाण्यात पती आणि इतर सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल
करण्यात आला आहे.
ही धक्कादायक घटना नाशिकच्या गंगापूर रोडवरील उच्चभ्रू वसाहतीत घडली. भक्ती अथर्व गुजराथी (वय ३७) असे मृत महिलेचं नाव आहे. भक्ती आणि अथर्व यांचा ७ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यांना एक ५ वर्षांचा मुलगा देखील आहे. मात्र, विवाहानंतर भक्तीवर सासरच्या मंडळींकडून शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता, असा आरोप तिच्या वडिलांनी केला.
भक्तीला त्रास होत असल्याचे लक्षात आल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तिला माहेरी आणले होते. पण, अथर्वने तिला पुन्हा सासरी नेले. मात्र, सासरच्या मंडळींकडून त्रास सुरूच राहिला. अखेर भक्तीने राहत्या घरात गळफास घेऊन आयुष्य संपवलं. या घटनेनंतर भक्तीच्या आई वडिलांनी गुजराथी कुटुंबाविरोधात तक्रार दाखल केली. त्यांनी अथर्व गुजराथी आणि त्याच्या कुटुंबावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. भक्तीच्या शरीरावर जखमांचे अनेक खुणा आढळल्यामुळे ही आत्महत्या की हत्या, याबाबत सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी तिच्या कुटुंबीयांनी केली आहे. तसेच तिच्या लहान मुलाच्या ताब्याबाबतही त्यांनी दावा केला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.