Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Breaking News! मास्क लावायची तयारी ठेवा, मुंबईत कोरोना रूग्णांची संख्या वाढली

Breaking News! मास्क लावायची तयारी ठेवा, मुंबईत कोरोना रूग्णांची संख्या वाढली
 

हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोना महामारीने पुन्हा डोकं वर काढलेय. दोन्ही देशातील कोरोना रूग्णाची संख्या झपाट्याटे वाढत आहे, त्यामुळे निर्बंध लावले जाणार आहे. हाँगकाँग आणि सिंगापूरनंतर आता मुंबईतही धोक्याची घंटा वाजली आहे. मुंबईमध्ये कोरोना रूग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे समजतेय. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रूग्णात झपाट्याने वाढ होत आहे. रुग्णसंख्येत आणि रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. सध्याच्या रुग्णांची लक्षणे सौम्य आहेत. २०२० ते २०२२ या काळात जगात हाहाकार माजवणाऱ्या आणि लाखो लोकांचा बळी घेणाऱ्या कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलेय. कोरोनाची साथ पुन्हा एकदा आली आहे, पण हा कोरोनाचा व्हेरिंयट तितका गंभीर नसल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केलेय.


कोरोना पुन्हा आला असला तरी घाबरण्याचे कारण नाही, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. कोरोनाची लक्षणे दिसल्यास घाबरून न जाता उपाय योजना कराव्यात, असेही सांगितलेय. केंद्रीय मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, शनिवारी देशात ९३ कोरोनाचे सक्रीय रूग्ण आहेत. मुंबईमध्ये महिन्याला १० ते १२ रूग्ण आढळतात. बीएमसीच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी सांगितले की, कोविडबाबत सध्या काळजी करण्याचे कारण नाही. कोरोना आपल्यामध्येच राहणार आहे, तो संपणार नाही. त्यामुळे घाबरण्यापेक्षा काळजी घ्यावी. बीएमसीच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने डॉक्टरांना तापाच्या रुग्णांबाबत सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दरम्यान, मुंबई महापालिकेतील सर्दी आणि तापाच्या रूग्णांकडे विशेष लक्ष देण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहे. शनिवारी ब्रीच कँडी रूग्णालयात कोरोनाचे दोन रूग्ण आढले आहे. ब्रीच कँडी रुग्णालयाचे डॉ. हेमंत ठक्कर यांनी TOI ला सांगितले की, शनिवारी सकाळी दोन रुग्णांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली. हाँगकाँग आणि सिंगापूरच्या दाट लोकवस्तीच्या भागात कोविडच्या नव्या लाटेच्या बातम्या येत असताना, एका रुग्णाला लंडनहून परतल्यानंतर घसा खवखवत होता आणि प्रचंड खोकला येत होता. त्यामुळे चाचणी केली. दुसऱ्या रुग्णाला तात्काळ प्रवासाचा इतिहास नसल्याचेही त्यांनी सांगितले.

हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोना झपाट्याने पसरत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या २८ ते ३० टक्क्यांनी वाढली आहे. येथील रूग्णसंख्या १५ हजार इतकी झाली आहे. त्यामुळे दोन्हीकडे निर्बंध लावण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. सिंगापूरनंतर मुंबईतही रूग्णांची संख्या वाढत असल्याचे समोर आलेय. प्रशासनाकडून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आलेय. डॉक्टरांनी नागरिकांना मास्क वापरणे, हात स्वच्छ ठेवणे आणि गर्दीच्या ठिकाणी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.