Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महापालिका कर्मचाऱ्यांची मालमत्ता जाहीर करा; CM फडणवीस निर्णय घेणार का?

महापालिका कर्मचाऱ्यांची मालमत्ता जाहीर करा; CM फडणवीस निर्णय घेणार का?
 

मुंबईसह महाराष्ट्रातील महापालिकांमध्ये भ्रष्टाचाराची प्रकरणे एकामागून एक उघडकीस येत असून, त्यात अनेक अधिकाऱ्यांचा सहभाग उघडकीस येत आहे. अशा प्रकरणांवर अंकुश ठेवण्यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांनी मालमत्ता जाहीर करावी,' अशी मागणी वॉचडॉग फाउंडेशनने केली आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई महापालिका आयुक्तांना याबाबत पत्र लिहिले आहे. वॉचडॉग फाउंडेशनचे गॉडफ्रे पिमेंटा यांनी सांगितले, "अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांनी त्यांच्या उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा जास्त मालमत्ता जमवली असल्याचे विविध प्रकरणांमध्ये उघड होत आहे. यामुळे प्रशासकीय व्यवस्थेवरून जनतेचा विश्वास कमी होत आहे".


वाढत्या भ्रष्टाचारामुळे पालिकेच्या तिजोरीत खडखडाट होत असून, प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. काही अधिकाऱ्यांनी त्यांच्या मूळ गावी त्यांच्या कुटुंबाच्या किंवा नातेवाइकांच्या नावावर किंवा काही प्रकरणांमध्ये नोकरांच्या नावावर स्थावर मालमत्ता केल्या आहेत. याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी गॉडफ्रे पिमेंटा यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 मध्ये नोटाबंदी केली होती. या काळात सोने, हिऱ्याच्या स्वरूपात लाच दिली जात होती, ज्याची चर्चा तेव्हा मोठ्या प्रमाणात होत होती. महाराष्ट्रातील सर्व महापालिकांमधील प्रत्येक कर्मचाऱ्याला त्यांच्या, त्यांच्या पती-पत्नी आणि अवलंबित मुलांच्या मालकीच्या सर्व मालमत्ता आणि मालमत्तेची माहिती देणारे वार्षिक प्रतिज्ञापत्र सादर करणे बंधनकारक केले पाहिजे, अशी प्रमुख मागणी केली आहे. अधिक पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी हे प्रतिज्ञापत्र सार्वजनिक डोमेनमध्ये उपलब्ध करून दिले पाहिजे, असेही वॉचडॉग फाउंडेशनचे गॉडफ्रे पिमेंटा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस सरकार असताना, राज्य सरकारच्या अधिकारी-कर्माचाऱ्यांप्रमाणे नगरपालिका, जिल्हा परिषद, महापालिकांसह निमसरकारी कर्मचाऱ्यांना मालमत्ता जाहीर करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी वेबसाइटच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना माहिती जाहीर करणे बंधनकारक केले पाहिजे, अशी देखील मागणी करण्यात आली होती. ही माहिती सादर करताना, प्रतिज्ञापत्राच्या स्वरूपात नसेल. स्थावर मालमत्ता कुठे असून जंगम मालमत्ता किती आहे, याची माहिती संबंधितांना आपल्या स्वाक्षरीसह तपशीलवार द्यावी लागेल, असा निर्णय घेण्यात आला होता.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.