'चार तासांच्या आत FIR दाखल करा'; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलेल्या भाजप मंत्र्याला HC ने फटकारले
कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याबद्दल उच्च न्यायालयाने मध्य प्रदेश सरकारचे कॅबिनेट मंत्री विजय शाह यांना फटकारले आहे. शाह यांच्याविरुद्ध ४ तासांच्या आत एफआयआर नोंदवा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. भाजप मंत्री विजय शाह यांनी एका
कार्यक्रमात, कर्नल सोफियाचे नाव न घेता केलेल्या विधानामुळे ते अडचणीत
आले. काँग्रेसनेही त्यांच्यावर कारवाईची मागणी केली.
ज्या लोकांनी आमच्या आया बहिणींचे सिंदूर नष्ट केले होते, आम्ही त्यांच्या बहिणीला मारेकऱ्यांच्या घरी पाठवले. त्यांनी आमच्या हिंदूंना कपडे काढून मारले आणि मोदीजींनी त्यांच्या बहिणीला आमच्या विमानातून त्यांच्या घरी पाठवले, असे वक्तव्य विजय शाह यांनी कर्नल सोफियाचे नाव न घेता केले होते. यामुळे शाह यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले.
आता उच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली आणि विजय शहा यांना फटकारले. शाह यांच्या विरुद्ध ४ तासांच्या आत एफआयआर दाखल करावा, असे उच्च न्यायालयात, न्यायमूर्ती अतुल श्रीधर यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी उद्या म्हणजेच गुरुवारी होणार आहे. दरम्यान, विजय शाह यांनी स्वतः या वादग्रस्त विधानाबद्दल माफी मागितली आहे. 'आमच्या बहिणींनी' सैन्यासह मोठ्या ताकदीने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.काँग्रेसने याप्रकरणी थेट विजय शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मध्य प्रदेश काँग्रेस युनिटचे अध्यक्ष जितू पटवारी यांनी 'एक्स' वर विजय शाह यांचा व्हिडिओ शेअर केला आहे. भाजप विजय शाह यांच्या 'नीच विचारसरणी'शी सहमत आहेत का? ते सांगा. विजय शहा यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री मोहन यादव यांनी उत्तर द्यावे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.