Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली :- कुपवाडमध्ये प्रेम प्रकरणातून 21 वर्षीय तरुणाचा खून; दोघांना अटक

सांगली :- कुपवाडमध्ये प्रेम प्रकरणातून 21 वर्षीय तरुणाचा खून; दोघांना अटक 
 


कुपवाड एमआयडीसीमधील बंद अवस्थेत असलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासमोरील रस्त्यावर उमेश मच्छिंद्र पाटील (वय २१, रा. श्रीनगर, मशिदीजवळ, कुपवाड) याचा डोक्यावर शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने कुपवाड पोलिसांच्या मदतीने संशयित साहिल ऊर्फ सुमित मधुकर खिलारी (वय २४, मूळ रा. बुलढाणा, सध्या रा. बामणोली), सोन्या ऊर्फ अथर्व किशोर शिंदे (वय २०, रा. बामणोली) या दोघांना अटक करून अल्पवयीन युवकास ताब्यात घेतले. प्रेमाच्या त्रिकोणातून हा खून झाल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, उमेश पाटील हा कुपवाड एमआयडीसीमधील ऐरावत पॅकेजिंग या कंपनीत सुपरवायझर म्हणून काम पाहत होता. संशयित सोन्या ऊर्फ अथर्व शिंदे हा देखील याच कंपनीत काम करत होता. उमेश आणि सोन्या यांच्यात प्रेमप्रकरणावरून धुसफूस सुरू होती. तसेच दोघांचा जोरदार वाद झाला होता. त्यामुळे सोन्याला उमेशवर राग होता. याच रागातून त्याने साथीदार साहिल आणि अल्पवयीन युवकाच्या मदतीने उमेशचा काटा काढायचा ठरवले. उमेश शुक्रवारी सकाळी ९ वाजता कामावर गेला होता. कामावर जाण्यासाठी महिन्यापूर्वी नवीन दुचाकी (एमएच १० ईएन ६६०१) घेतली होती. रात्री नटराज कंपनीजवळ साहिल, सोन्या आणि अल्पवयीन मुलाने उमेशला अडवून त्याच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारले. उमेश गंभीर जखमी होऊन खाली पडल्यानंतर हल्लेखोर पळाले.

दरम्यान, रात्री ९.४५ च्या सुमारास उमेश पाटील याच्यावर हल्ला झाल्यानंतर कंपनीतील एका कामगाराने याबाबत उमेशच्या घरी जाऊन आईवडील तसेच भावाला 'उमेशला काहीतरी झाले आहे. तो नटराज कंपनीजवळ पडला आहे' असे सांगितले. त्यामुळे उमेशचा भाऊ महेश कामगाराच्या दुचाकीवर बसून घटनास्थळी गेला. या वेळी उमेश पाटील हा रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्धावस्थेत पडलेला होता. त्याच्या डोक्यावर वार झाल्याचे दिसत होते.

तेवढ्यात उमेशच्या कंपनीचे मालक विनायक घुळी व इतर कामगार उपस्थित होते. महेश पाटील व कामगार जकाप्पा लवटे या दोघांनी आयुष हेल्पलाइन टीमच्या मदतीने रुग्णवाहिकेतून जखमी उमेशला मिरजेतील शासकीय रुग्णालयात दाखल केले. जखमी उमेशचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. भाऊ महेश पाटील यांनी कुपवाड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
खुनाची माहिती मिळताच मिरजेचे पोलिस उपअधीक्षक प्रणील गिल्डा, कुपवाडचे सहायक निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. सांगलीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी कुपवाड पोलिसांच्या दोन पथके हल्लेखोरांच्या शोधासाठी रवाना केली होती. सहायक निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकातील सतीश माने, सागर लवटे यांना संशयित साहिल खिलारी वन विभागाच्या रस्त्यावर थांबल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदार सोन्या शिंदे व अल्पवयीन युवक अशा तिघांनी खून केल्याची कबुली दिली. तिघांना कुपवाड पोलिसांच्या ताब्यात दिले.

प्रेमप्रकरणातून वाद

मृत उमेश आणि संशयित सोन्या यांच्यात प्रेमप्रकरणावरून वाद झाला होता. प्रेमाचा त्रिकाेण झाला होता. त्यातून दोघांमध्ये वाद झाला. उमेश हा सुपरवायझर असल्यामुळे तो सतत कामाला जुंपून स्वत: महिलेशी जास्त बोलत असल्याचा सोन्याला राग होता. त्यातून साथीदारांच्या मदतीने खून केल्याचे कबूल केले.

काही तासांत छडा
खुनानंतर गुन्हे अन्वेषण व कुपवाड पोलिसांची पथके संशयितांच्या मागावर होती. कसून तपास केल्यानंतर खुनाचे नेमके कारण समजले. त्यानंतर काही तासांतच दोघांना अटक करून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत छडा लावला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.