खलिस्तान्यांची पंतप्रधान मोदींना ठार मारण्याची उघड धमकी; भारताचा 'तिरंगा'ही तलवारीने फाडून जाळला
कॅनडातील खलिस्तानी समर्थकांच्या कारवाया पुन्हा एकदा भारत-कॅनडा संबंधांमध्ये गंभीर तणाव निर्माण करत आहेत. नुकत्याच घडलेल्या घटनेत खलिस्तानी समर्थकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ठार मारण्याची उघड धमकी दिली असून भारतीय तिरंग्याचाही अपमान केलाय.
खलिस्तान्यांची ही निदर्शने कॅनडाचे नवनिर्वाचित पंतप्रधान मार्क कार्नी यांनी पंतप्रधान मोदींना G7 शिखर परिषदेसाठी दिलेल्या निमंत्रणानंतर सुरू झाली. G7 चे अध्यक्षपद सध्या कॅनडाकडे असून 15 ते 17 जून दरम्यान अल्बर्टा येथे परिषद होणार आहे. पंतप्रधान मोदींनी नुकत्याच झालेल्या संवादात हे निमंत्रण स्वीकारलं आहे.
खलिस्तानी समर्थकांकडून उघड धमक्या
खलिस्तानी समर्थकांनी व्हँकुव्हर व अन्य कॅनेडियन शहरांमध्ये रॅली काढत "Kill Modi" अशा घोषणा दिल्या. याच रॅलीदरम्यान भारतीय तिरंगा तलवारीने फाडण्यात आला व नंतर जाळण्यात आला. हे प्रकरण १९ ऑक्टोबर २०२४ च्या घटनांची पुनरावृत्ती ठरली आहे, जेव्हा खलिस्तानी समर्थकांनी पंतप्रधान मोदींच्या पुतळ्याचा आणि तिरंग्याचा अपमान केला होता.
कॅनडियन तपास पत्रकार मोचा बेझिरगन यांनी सांगितलं, की रॅली दरम्यान मला खलिस्तानी समर्थकांनी घेरून धमकावलं. या निदर्शकांनी इंदिरा गांधींच्या हत्येचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींबाबत तेच घडवण्याची धमकीही दिली.
SFJ संघटनेचा प्रमुख गुरपतवंत पन्नूने जारी केला व्हिडिओ
बंदी घातलेल्या 'शीख फॉर जस्टिस' (SFJ) संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू याने एक व्हिडिओ जारी करून पंतप्रधान मोदींना लक्ष्य करण्याची "ऐतिहासिक संधी" असल्याचं म्हटलंय. त्यानं मोदींच्या कॅनडा दौऱ्यादरम्यान ४८ तासांचा निषेध करण्याची घोषणाही केली आहे.
भारत सरकारनं या धमक्यांना अत्यंत गंभीरपणे घेतले आहे. भारताने यापूर्वीही कॅनडामधील खलिस्तानी कारवायांबाबत सातत्याने चिंता व्यक्त केली आहे. २०२३ मध्ये कॅनडाच्या तत्कालीन पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येत भारतीय एजंटांचा सहभाग असल्याचा आरोप केला होता, जो भारताने 'निराधार आणि राजकीयदृष्ट्या प्रेरित' म्हणून फेटाळून लावला होता.
गुरपतवंत सिंग पन्नू याने २०२३ मध्ये कॅनडातील हिंदूंना देश सोडण्याची धमकी दिली होती. यामुळे कॅनेडियन हिंदू समाजात भीतीचे वातावरण पसरले होते. यानंतर एनडीपी पक्षाकडून खलिस्तानी समर्थकांना मिळणारा पाठिंबा भारतासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी कॅनडामधील हिंदू मंदिरांवर आणि भारतीय समुदायावर झालेल्या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला होता. भारताने कॅनडाकडे खलिस्तानी समर्थकांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
भारत-कॅनडा संबंधांवर परिणाम
G7 परिषदेसाठी पंतप्रधान मोदींना आमंत्रित करणे हा भारत-कॅनडा संबंध सुधारण्याचा प्रयत्न मानला जात होता. मात्र, या ताज्या घटनांमुळे संबंधांवर पुन्हा तणावाचे सावट पसरले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.