Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धक्कादायक! ख्यातनाम मानसोपचार तज्ज्ञ डॉ. जावरकर यांनी संपवलं जीवन; विषारी इंजेक्शन टोचून घेतलं

धक्कादायक! ख्यातनाम मानसोपचार तज्ज्ञ डॉ. जावरकर यांनी संपवलं जीवन; विषारी इंजेक्शन टोचून घेतलं
 

अकोल्यातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रशांत जावरकर यांनी विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली आहे. न्यू तापडिया नगर येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं कळतंय.

समुपदेशन करणाऱ्या डॉक्टरांचीच आत्महत्या, वैद्यकीय क्षेत्रात खळबळ
डॉ. जावरकर हे अकोल्यातील ख्यातनाम मानसोपचार तज्ज्ञ डॉ. दीपक केळकर यांच्या 'सन्मित्र हॉस्पिटल'मध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत होते. तणाव, नैराश्य आणि मानसिक आजारांनी त्रस्त रुग्णांना समुपदेशन करून मदत करणाऱ्या डॉक्टरांनी स्वतःच जीव संपवल्याची ही घटना मन सुन्न करणारी आहे. या घटनेमुळे संपूर्ण अकोला शहरातील वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. नेहमी सकारात्मक विचार मांडणारे, रुग्णांच्या समस्या समजून घेऊन त्यांना मानसिक आधार देणारे डॉ. जावरकर स्वतः इतक्या मोठ्या तणावाखाली होते का, हा प्रश्न आता उपस्थित होतोय.


आत्महत्येचं कारण अस्पष्ट; पोलिसांकडून तपास सुरू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. जावरकर यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. प्राथमिक तपासात त्यांनी विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. रुग्णांना मानसिक आधार देणाऱ्या डॉक्टरांनीच आत्महत्येचा निर्णय घेतल्यामुळे ही घटना अधिक धक्कादायक मानली जात आहे.

सोलापूरमधील वळसंगकर आत्महत्या प्रकरणाची चर्चा
या घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरमधील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणाचीही चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. या प्रकरणात आरोपी मनीषा मुसळे हिच्या विरोधात पोलिसांनी अलीकडेच ७२० पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. दोषारोपपत्रानुसार, मनीषा मुसळे हीच डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येस कारणीभूत होती. रुग्णालयातील मनीषाची अरेरावी आणि पैशांचा गैरव्यवहार लक्षात आल्यानंतर डॉ. शिरीष यांनी डिसेंबर २०२४ पासून तिचे अधिकार कमी केले होते, असं पोलिसांनी दोषारोपपत्रात नमूद केलं आहे. डॉ. शिरीष वळसंगकर यांनी १८ एप्रिल रोजी रात्री स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. डॉक्टरांच्या आत्महत्येच्या या वाढत्या घटना समाजातील मानसिक आरोग्याच्या स्थितीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.