हिंदू स्मशानभूमीत बौद्ध मुलीवर अंत्यसंस्कार करण्यास मनाई
उमरखेड: छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज, यांच्या महाराष्ट्रात आजसुद्धा जातीयता आणि जातीवाद कमी झालेला दिसत नाही, काही लोकांमध्ये आजही जातीवाद ठासून भरलेला आहे. असाच काहीसा प्रकार, माणुसकीला काळिमा फासणारी घटना उमरखेड तालुक्यातील आदर्श गाव म्हणून नावारूपाला आलेल्या पिंपळदरी येथे शुक्रवार, 13 जून रोजी घडली.
पिंपळदरी येथील 20 वर्षीय बौद्ध समाजाच्या मुलीचे निधन झाले. गावात दोन स्मशानभूमी असून बौद्ध व मातंग समाजासाठी एक आणि गावातील इतर समाजासाठी एक अशा दोन स्मशानभूमी आहेत. पण बौद्ध व मातंग समाज बांधवांची स्मशानभूमीची जी जागा आहे तिथे दहनशेड नाही. पावसाचे दिवस असल्याने उघड्यावर अंत्यसंस्कार करणे कठीण होते म्हणून गावातील दहनशेड असलेल्या स्मशानभूमीत बौद्ध समाजाच्या मुलीचे अंतिम संस्कार करण्याचे ठरवले होते. त्यानुसार दहनशेडमध्ये सरणसुद्धा रचण्यात आले होते. पण ऐनवेळी गावातील काही जातीवादी नागरिकांनी आमच्या स्मशानभूमीत बौद्ध समाजाच्या मुलीचे अंत्यसंस्कार केले तर उद्या मातंग समाजाचे लोकसुद्धा इकडेच अंत्यसंस्कार करतील, असा कांगावा करत रचलेले सरण काढून टाकले आणि तुम्ही तुमच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करा, असा पवित्रा घेतला.
त्यामुळे त्या मृत मुलीवर ऐन पावसाळ्याच्या दिवसात उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ काही जातीवादी लोकांमुळे आली. भविष्यात अशी वेळ येऊ नये म्हणून गावातील बौद्ध व मातंग समाजबांधवांनी मंगळवार, 17 जूनला उमरखेड तहसीलदार व गटविकास अधिकाèयांना निवेदन देऊन तत्काळ दहनशेड बांधून देण्याची मागणी केली. निवेदन पाहताच तहसीलदारांनी मुळावा मंडळ अधिकारी यांना तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. तर गटविकास अधिकाèयांनी उद्याच दहनशेडचा प्रस्ताव तयार करून पाठविण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
'त्यांच्यावर' गुन्हेच दाखल करा : आमदार
पिंपळदरी येथे घडलेला प्रकाराची माहिती उमरखेडचे आमदार वानखेडे यांना मिळताच अशा जातीवादी प्रवृत्तीच्या लोकांवर गुन्हेच दाखल व्हायला पाहिजेत अशी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली. आमदार निधीतून पिंपळदरी येथील बौद्ध व मातंग समाज बांधवांच्या स्मशानभूमीसाठी तत्काळ निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.