Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली :- घराबाहेर बुटात चावी ठेवणे पडले महागात

सांगली :- घराबाहेर बुटात चावी ठेवणे पडले महागात
 

सांगली : फ्लॅटला कुलूप लावून चावी बाहेर बुटात ठेवणे एका नागरिकाला चांगलेच महागात पडले आहे. चोरट्याने बुटात ठेवलेली ही चावी घेऊन भरदिवसा फ्लॅटचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला अन् दागिने, रोकड असा पाच लाख 44 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना गावभाग परिसरातील संग्राम चौकात जय अपार्टमेंटमध्ये दि. 16 रोजी घडली. याबाबत सांगली शहर पोलिसांत नोंद झाली आहे. किरण गजानन केसरे (वय 50) यांनी पोलिसांत फिर्याद दिली.

फिर्यादी केसरे गावभागातील संग्राम चौकात जय अपार्टमेंटमध्ये कुटुंबासह राहतात. सोमवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ते कुटुंबासह कामानिमित्त बाहेर गेले होते. यावेळी त्यांनी घराच्या कुलपाची चावी दरवाजाबाहेरील बुटात ठेवली होती. चोरट्याने बुटातील चावी घेऊन फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप काढत आत प्रवेश केला. हॉलमधील तिजोरीचे लॉक तोडले. लॉकरमध्ये ठेवलेले 60 हजारांचे सोन्याचे मणी आणि पेंडंट, 73 हजार 800 रुपयांचा सोन्याचा नेकलेस, 45 हजारांचे सोन्याचे टॉप्स, 60 हजारांची सोन्याची टिक्की, 60 हजारांच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, 45 हजारांच्या दोन लहान सोन्याच्या अंगठ्या, 21 हजारांच्या कानातील रिंगा, 21 हजारांचे कानातील टॉप्स, 30 हजारांचे वेढण, 36 हजारांचे कानातील झुबे, 60 हजारांच्या दोन बोरमाळ, सहा हजारांची कानातील लहान रिंग, चांदीचे फूल आणि 25 हजार रोकड असा एकूण 5 लाख 44 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. दुपारी अडीच वाजता केसरे घरी परतले असता त्यांना चोरीची घटना निदर्शनास आली. त्यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना केल्या. पोलिसांनी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.