Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जत येथे प्रांत कार्यालयावर काढला गाढव मोर्चा

जत येथे प्रांत कार्यालयावर काढला गाढव मोर्चा
 

जत : जत शहरातून सांगोलाकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ जी याचे रखडलेले व चुकीचे काम तत्काळ दुरुस्त करावे, या मागणीसाठी मंगळवारी दलित महासंघ मोहिते गटाचे डॉ. उत्तम मोहिते यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार यांच्या नेतृत्वाखाली जत प्रांत कार्यालयावर गाढव मोर्चा काढण्यात आला.

यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता खालिद शेख यांना निवेदन देण्यात आले. जत शहरातून राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५ जी जातो. या मार्गावर जत शहरातील विठ्ठलनगर परिसर आहे. या परिसरात राष्ट्रीय महामार्गाने अतिशय चुकीच्या पद्धतीने काम केले आहे. या भागात रस्ते डिव्हाडरचे काम चुकीच्या पद्धतीने केले आहे. रस्त्याच्या दुतर्फा सुरक्षा कठडे नाहीत. झेब्रा क्रॉसिंग नाही. दुभाजक नजीक सिग्नल नाही. दिशादर्शक फलक नाहीत. भागात महामार्गावरील सर्व पथदिवे बंद आहेत. काही पथदिवे खांब उन्मळून पडलेले आहेत. सांगोल्याकडून येणाऱ्या वाहनांना दुभाजक स्पष्ट दिसत नाहीत. नगरपालिका प्रशासनाने सर्व सुविधा द्याव्यात, राष्ट्रीय महामार्ग अधिकारी व स्थानिक प्रशासनाने कोणतीही ठोस भूमिका घेऊन विठ्ठलनगर भागातील समस्या सोडवाव्यात.

यावेळी डॉ. उत्तम मोहिते, जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार, जागर फाउंडेशनचे परशुराम मोरे, कार्याध्यक्ष नितीन जाधव, तालुकाध्यक्ष नवनाथ पवार, सिद्धेश्वर जाधव, जोकेश आदाटे, अतुल ऐवळे, आनंद कांबळे, आनंद पाथरवट, किरण संकपाळ, अभिनंदन साबळे, वैभव जाधव, लकी पवार, सोहेल पवार, रोहित पवार आदी उपस्थित होते.

कामे मार्गी लावणार
विठ्ठलनगर परिसरातील समस्या पाहून येत्या आठ दिवसांत राष्ट्रीय महामार्गाचे चुकीचे व रखडलेली सर्व कामे मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन उपअभियंता शेख यांनी उपस्थित आंदोलकांना यावेळी दिले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.