Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

डायबिटिस असेल तर पोहे खाणं कितपत सुरक्षित? पोषणतज्ज्ञ सांगतात, खायचेच असतील तर पोहे 'असे' खा...

डायबिटिस असेल तर पोहे खाणं कितपत सुरक्षित? पोषणतज्ज्ञ सांगतात, खायचेच असतील तर पोहे 'असे' खा...
 

मस्त गरमागरम पोहे महाराष्ट्रासोबतच संपूर्ण भारतातील अनेकांचा आवडता नाश्त्याचा पदार्थ आहे. आपल्याकडे सकाळच्या नाश्त्याला घाई - गडबडीत झटपट काहीतरी करायचं झालं की हमखास पोहे केले जातात. पिवळेधम्मक शेंगदाणे, शेव, कोथिंबीर भुरभुरवून केलेले पोहे खायला कुणाला आवडणार नाही. हलके, पटकन तयार होणारे आणि चविष्ट असलेले पोहे आरोग्यदृष्ट्या किती फायदेशीर  आहेत, असा विचार अनेकदा मनात येतो. अशातच जर घरात मधुमेह असणारी व्यक्ती असेल तर, मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी पोहे खावेत की खाऊ नये असा प्रश्न पडतो

डायबिटीस झाल्यानंतर खाण्या-पिण्याच्या सवयींवर अनेक बंधनं येतात, आणि अनेकदा आपले आवडते पदार्थ आपल्याला खाणे टाळावे लागतात, त्यातलेच एक म्हणजे 'पोहे'. डायबिटीस म्हणजे केवळ साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे नव्हे, तर संपूर्ण आहारावर बारकाईने लक्ष द्यावे लागते. लखनऊच्या विकास नगर येथील न्यूट्रीवाइज क्लिनिकच्या पोषणतज्ज्ञ नेहा सिन्हा यांनी onlymyhealth.com ला दिलेल्या मुलाखतीत, मधुमेहाच्या रुग्णांसाठी पोहे किती सुरक्षित आहे, त्याचे फायदे आणि तोटे काय आहेत आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी ते कसे खावे याबद्दल अधिक माहिती सांगितली आहे.

मधुमेह असणाऱ्यांनी पोहे खावेत की खाऊ नये ?
पोषणतज्ज्ञ नेहा सिन्हा यांच्यामते, मधुमेहाचे रुग्ण पोहे खाऊ शकतात, परंतु फक्त पोहे खाण्याऐवजी त्यात प्रथिन आणि फायबरयुक्त पदार्थांचे प्रमाण वाढवून मगच ते खाणे मधुमेहींसाठी फायदेशीर ठरेल. यासाठीच, मधुमेह असणाऱ्यांनी नुसते पोहे न खाता त्यात भाज्या घालून पोहे खावेत. पोह्यात आपण फरसबी, शिमला मिरची, कोथिंबीर, गाजर, टोमॅटो आणि कांदे घालून देखील खाऊ शकता. जर मधुमेहाचे रुग्ण पोहे खात असतील तर, पोह्यात बटाटे घालू नका आणि भाजलेल्या शेंगदाण्याचे प्रमाण देखील फार कमी ठेवा. आजकाल लोक काकडी घालून पोहे खातात जो मधुमेहींसाठी देखील एक चांगला पर्याय आहे. हे देखील लक्षात ठेवा की पोह्यात एकूण पोह्यांच्या प्रमाणापेक्षा तिप्पट जास्त भाज्या असाव्यात. तरच मधुमेह असणाऱ्यांनी पोहे खाणे फायदेशीर ठरेल.
पोह्यातील पौष्टिक मूल्य...

पोहे म्हणजे एक प्रकारचे फ्लॅट राईसच असतात. तांदूळ वाफवून, सुकवून मग त्यापासून पोहे तयार केले जातात. एक वाटी पोह्यात सुमारे २५० ते ३०० कॅलरीज असू शकतात. त्यात भाज्या घातल्याने व्हिटॅमिन 'ए' आणि 'सी' मिळते. पोह्यात लोहाचे प्रमाण हे भरपूर असते, ज्यामुळे ते अशक्तपणा आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे फायदेशीर ठरू शकते. १ वाटी पोह्यात सुमारे ४०० ते ५०० मिलीग्राम पोटॅशियम, २०० ते ३०० मिलीग्राम सोडियम, ४ ते ६ ग्रॅम फायबर, ५ ते ७ ग्रॅम प्रथिनांचे प्रमाण असते. पोह्यात ४ ते ६ ग्रॅम फॅट, ४० ते ५० ग्रॅम कार्ब्स असतात.

मधुमेही व्यक्तींनी पोहे खाताना कोणती काळजी घ्यावी ?
१. पोह्यात फरसबी, शिमला मिरची, हिरवे वाटणे, कोथिंबीर, गाजर, टोमॅटो आणि कांदे यांसारख्या भाज्या घालून मगच पोहे खा.

२. फायबर आणि प्रथिने वाढवण्यासाठी, तुम्ही त्यात उकडलेले हरभरा किंवा सोयाबीनचे तुकडे देखील घालू शकता.

३. पोह्यांवर लिंबू पिळून खाल्ल्याने देखील नक्कीच फायदा होऊ शकतो.

४. सकाळी नाश्त्याच्या वेळी पोहे खाणे आणि मर्यादित प्रमाणात म्हणजेच १ वाटी पोहे खाणे आरोग्यदायी मानले जाते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.