मुंबई : घरगुती, औद्योगिक व व्यावसायिक अशा सर्वच ग्राहकांच्या वीजदरात आगामी पाचही वर्षांत कपात करण्याचा आदेश देत महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने वीज ग्राहकांना दिलासा दिला आहे. या निकालानुसार राज्यात पहिल्या वर्षी १० टक्के तर पुढे टप्प्याटप्प्याने पाच वर्षात २६ टक्क्यांपर्यंत वीजदर कमी होणार आहेत.
राज्यात १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्यांचे प्रमाण हे ७० टक्के आहे. त्यांच्यासाठी जुलैपासून १० टक्के इतके सर्वाधिक दर कमी होतील. १०० पासून ५०० युनिट पर्यंतची वीज वापरणाऱ्या ग्राहकांना १ जुलैपासून वाढीव दराने विजेचे बिल भरावे लागणार आहे. राज्याच्या इतिहासात प्रथमच महावितरणने वीजदरात कपातीचा प्रस्ताव सादर केला होता. स्मार्ट मीटर असलेल्या घरगुती ग्राहकांना दिवसा वीजवापरासाठी १० टक्के अतिरिक्त टीओडी सवलत आणि सौरऊर्जा निर्मिती करणाऱ्या घरगुती ग्राहकांना प्रोत्साहन, अशी आयोगाच्या आदेशाची वैशिष्ट्ये आहेत.
आयोगाने महावितरणच्या याचिकेवर वीज ग्राहकांना दिलासा देणारा निर्णय दिल्याबद्दल त्यांचे आभारी आहोत. या आदेशाचा लाभ घरगुती ग्राहक, औद्योगिक ग्राहक आणि व्यावसायिक ग्राहक अशा तीनही वर्गवारीत होणार आहे. बळीराजाला दिवसा व खात्रीचा वीजपुरवठा होण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० चे काम सुरु आहे. सोबतच आगामी काळात वीजखरेदी करारांमध्ये हरितऊर्जेवर मोठ्या प्रमाणात भर दिल्यामुळे वीजखरेदी खर्चात बचत होणार आहे. त्यामुळेच हा दर कमी करण्याचा प्रस्ताव महावितरणला मांडता आला. -देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री वीजदर कपातीमुळे घरगुती ग्राहकांना दिलासा तर उद्योग व्यवसायांना चालना मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनाचे पालन झाले आहे. - लोकेश चंद्र, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.