कोल्हापुरातील 'या' तालुक्याला व्हायचंय गोव्यात सामिल; CM प्रमोद सावंत, PM नरेंद्र मोदींना देणार निवेदन
आजरा: आजरा तालुका गोवा राज्यात समाविष्ट करावा, अशी उद्विग्नता तालुक्यातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. याबाबतचे निवेदन आजऱ्याचे तहसीलदार समीर माने यांना देण्यात आले. जिल्हा परिषदेचा एक मतदार व दोन पंचायत गण कमी होण्याच्या पार्श्वभूमीवर येथे विविध पक्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अनेकांनी तीव्र शब्दांत भावना व्यक्त केल्या. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष तानाजी देसाई म्हणाले, तालुक्याचा विकास दर चांगला राहिलेला नाही.
तालुक्याची राजकीय मोडतोड व हानी झाली आहे. राजकीय उपेक्षाच वाट्याला आली आहे. ती दूर करायची असेल, तर आम्हाला गोवा राज्यात समाविष्ट करावे. भौगोलिकदृष्ट्या आम्ही गोवा राज्याशी संलग्न आहोत. तालुक्यातील तरुणांना गोव्यात रोजगाराची संधी मिळाली आहे. येथील पोल्ट्री, काजू व्यवसाय व शेतीमालाला गोव्याची बाजारपेठ उपलब्ध आहे.तालुक्याला कोल्हापूर, मुंबईपेक्षा गोवा जवळचा आहे. या बैठकीत आजरा तालुका काजू प्रक्रिया संघटनेचे प्रकाश कोंडुसकर, महाराष्ट्र धरणग्रस्त संघटनेचे प्रमुख शिवाजी गुरव, श्रमिक मुक्ती दल (लोकशाहीवादी) संजय तर्डेकर, आजरा तालुका पोल्ट्री व्यावसायिक संघटनेचे राजू होलम, सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्रचे जिल्हाध्यक्ष जी. एम. पाटील यांनी भावना व्यक्त केल्या. यावेळी माजी सभापती निवृत्ती कांबळे, कृष्णा पाटील, जयवंत पाटील, सखाराम केसरकर, युवराज देसाई आदी उपस्थित होते.
गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार
स्वाभिमानी
संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली गोव्याचे मुख्यमंत्री
डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेण्यात येणार असून, पंतप्रधानांनाही निवेदन
पाठवणार असल्याचे तानाजी देसाई यांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.