नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी दोन आमदारांना राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. प्रफुल पटेल यांनी पक्षाच्या दोन्ही आमदारांना पत्र पाठवलं आहे. त्यातील एक आमदार राज्य सरकारमध्ये मंत्री आहे.
वन मंत्री ए. के. ससींद्रन आणि पक्षाचे केरळ युनिटचे अध्यक्ष थॉमस के. थॉमस यांच्यासह राष्ट्रवादीचे दोन आमदार सध्याच्या घडीला शरद पवार यांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेस (शप) गटाशी संबंधित आहेत. ते सत्ताधारी लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटचा (एलडीएफ) भाग आहेत. थॉमस यांना पाठवलेल्या पत्रात पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं निवडणूक चिन्ह असलेल्या घड्याळाचा उल्लेख केला आहे. 'हे आमदार २०२१ मध्ये राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर विधानसभा निवडणूक जिंकून आले आणि आता पक्षविरोधी कारवाया करत आहेत,' असं पटेल यांनी पत्रात नमूद केलं आहे.
राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी ४ जुलैला लिहिलेलं पत्र आता समोर आलं आहे. 'थॉमस यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. त्यांनी एका आठवड्यात आपल्या पदाचा राजीनामा द्यावा किंवा लोकप्रतिनिधीत्व अधिनियम आणि पक्षांतर विरोधी कायद्याच्या तरतुदींच्या आधारे अपात्र करण्याच्या आदेशांचा सामना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत,' असं पटेल यांनी पत्रात म्हटलं आहे.केरळ राष्ट्रवादी काँग्रेसमधील सुत्रांच्या माहितीनुसार, पटेल यांनी अशाच आशयाचं पत्र वन मंत्री ए. के. ससींद्रन यांनाही पाठवलं आहे. थॉमस यांनी या सगळ्या प्रकरणावर भाष्य केलं आहे. 'राष्ट्रवादी काँग्रेसचं केरळ युनिट आधीपासूनच शरद पवारांना नेता मानतं. त्यांनाच नेता आम्ही काम करत आलेलो आहोत. आम्ही या पत्राकडे दुर्लक्ष करतोय. कारण आमचा प्रफुल पटेल यांच्या पक्षाशी संबंध नाही,' असं थॉमस यांनी सांगितलं.पटेल यांनी पक्षांतर विरोधी कायद्याच्या अंतर्गत कारवाई करण्याची धमकी दिल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष थॉमस यांना विचारण्यात आलं. त्यावर यावर विधानसभा अध्यक्षांचा निर्णय घ्यायचा आहे, असं उत्तर थॉमस यांनी दिलं. राज्याचे वनमंत्री ससींद्रन यांनीही पटेल यांच्या पत्रावर प्रतिक्रिया दिली. केरळ युनिट त्या पत्राचा विचार करणार नाही. आम्ही पक्षाच्या घटनेनुसार काम करतो आणि करत राहू, असं ते स्पष्टपणे म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.