मुंबई विमानतळावर थरार! Air India फ्लाइटचे 3 टायर फुटले; मुसळधार पावसात नेमकं काय घडलं, प्रवाशांची काय स्थिती?
मुंबई : कोचीहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइट AI2744 चा आज (सोमवार) सकाळी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंगदरम्यान अपघात घडला. मुसळधार पावसात लँडिंग करताना विमानाने धावपट्टीवरून घसरत नियंत्रण गमावल्याने ही घटना घडल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे.
लँडिंगदरम्यान विमान धावपट्टीवरून घसरले
मिळालेल्या माहितीनुसार, खराब हवामानामुळे लँडिंग करताना काही क्षणांतच विमानाने नियंत्रण गमावले आणि धावपट्टीवरून घसरले. या घटनेत विमानाचे तीन टायर फुटल्याचे उघड झाले असून, इंजिनाचेही काही प्रमाणात नुकसान झाले असण्याची शक्यता आहे.
वैमानिकाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
अपघाताची तीव्रता लक्षात घेता, वैमानिकाची सतर्कता आणि त्वरित प्रतिसादामुळे मोठा अनर्थ टळला. विमान थेट टर्मिनल गेटपर्यंत सुरक्षितरित्या पोहोचले. सर्व प्रवासी सुखरूप असून कोणालाही गंभीर दुखापत झाल्याची माहिती नाही.
प्रशासनाकडून तपास सुरू
या घटनेनंतर एअर इंडिया आणि विमानतळ प्रशासनाकडून अपघाताच्या कारणांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे धावपट्टीवर पाणी साचले होते का, याचाही तपास सुरू आहे. संबंधित यंत्रणांनी सुरक्षा प्रोटोकॉलनुसार त्वरित मदतकार्य हाती घेतले.
CSMIA च्या प्रवक्त्यांनी काय सांगितलं?
कोचीहून मुंबईकडं येणारं एका विमान आज सकाळी ०९:२७ वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत असताना धावपट्टीवरून घसरण्याची घटना घडली. दरम्यान, या परिस्थितीवर तात्काळ नियंत्रण मिळवण्यासाठी CSMIA च्या आपत्कालीन प्रतिसाद पथकांना सक्रिय करण्यात आलं. सुदैवानं या घटनेत सर्व प्रवासी आणि क्रू सदस्य सुरक्षित आहेत. या घटनेमुळे विमानतळाची मुख्य धावपट्टी क्रमांक ०९/२७ चे किरकोळ नुकसान झाल्याचे प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे विमानतळावरील सेवा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी पर्यायी धावपट्टी क्रमांक १४/३२ सक्रिय करण्यात आली आहे, असंही त्यांनी सांगितलं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.