Big Breaking! धनुभाऊ नव्हे तर 'या' नेत्याची मंत्रिमंडळात होणार वाईल्ड कार्ड एन्ट्री? एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर चर्चांना उधाण
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात मंत्रिमंडळातील खांदेपालटाविषयी जोरदार चर्चा सुरु आहेत. राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे वारंवार 'सेल्फ गोल' करत असल्याने त्यांचे मंत्रिपद धोक्यात आले आहे. येत्या काही दिवसांमध्ये माणिकराव कोकाटे यांची कृषीमंत्रिपदावरुन उचलबांगडी होईल, अशी चर्चा आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांच्या मंत्रिपदावरही गंडांतर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अशातच माणिकराव कोकाटे यांना कृषीमंत्रिपदावरुन दूर केल्यास त्यांच्या जागी धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात आणले जाऊ शकते, अशी हवा पसरली आहे. परंतु, आता या सगळ्या शक्यतांना फाटा देत राज्य मंत्रिमंडळात सध्या अज्ञातवासात असलेल्या नेत्याची वाईल्ड कार्ड एन्ट्री होण्याची शक्यता आहे.
शिंदे गटाचे माजी मंत्री तानाजी सावंत यांचे नाव अचानक मंत्रिमंडाळासाठी चर्चेत आले आहे. त्याला कारण आहे एकनाथ शिंदे यांनी घेतलेली तानाजी सावंत यांची भेट. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंत यांच्या पुण्यातील घरी जात भेट घेतल्याने ही भेट राजकीय बदलाचे संकेत मानले जात आहेत. मंत्रिपद न मिळाल्याने गेल्या नऊ महिन्यांपासून नाराज असलेल्या तानाजी सावंत यांच्या घरी जात एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेतली.
याच भेटीमुळे मंत्रिमंडळ विस्तारात तानाजी सावंत यांना पुन्हा मंत्रीपद मिळणार असल्याची भाकितं वर्तवली जाऊ लागली आहेत. एकना शिंदे आणि तानाजी सावंत यांच्या भेटीचे फोटो समोर आल्याने सावंत समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे
हे तानाजी सावंत यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या घरी गेले
होते. मात्र, या भेटीकडे राजकीय बदलांचे संकेत म्हणून पाहिले जात आहे.
मात्र, तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळात घ्यायचे झाल्यास कोणत्या विद्यमान
मंत्र्याला बाहेरचा रस्ता दाखवला जाणार, याचीही आता चर्चा सुरु झाली आहे.
अजितदादा माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज सकाळी भेट होण्याची शक्यता आहे. दुपारी साडे बारा वाजता कॅबिनेट बैठक होणार आहे. त्याआधी अजित पवार आणि माणिकराव कोकाटे यांची भेट होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा न घेतल्यास शेतकऱ्यांना सोबत घेऊन छावा संघटनेच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर अजित पवार कोकाटेंबाबत काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शेतकऱ्यांचा विरोध पक्षाला परवडणारा नाही, असं पक्षातील काही नेत्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे अजित पवार काय निर्णय घेतात, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.