"बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता बिहतानी चड्डीत राहायचं.", मीरा-भाईंदरमधील मोर्चानंतर मनसेकडून कडक इशारा
मराठी विरुद्ध हिंदीवरून महाराष्ट्रात सुरू असलेल्या भाषेच्या वादाला आता राजकीय वेग आला आहे. या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) आमनेसामने आले आहेत.
तर दुसरीकडे मीरा रोड येथील एका मिठाई दुकानदाराला मराठीत बोलण्यास नकार दिल्यामुळे मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना घडली होती. या घटनेच्या निषेधार्थ मीरा-भाईंदरमधील व्यापारी संघटनांनी बंद पुकारला होता. याचपार्श्वभूमीवर अनेक दुकाने बंद ठेऊन व्यापाऱ्यांनी या घटनेचा निषेध नोंदवला आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. अशातच आता मनसे या प्रकरणात आक्रमक झाली आहे.
संदीप देशपांडेचा इशारा
बेपारी आहात बेपार करा,आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका.महाराष्ट्रात मराठीचा अपमान कराल तर कानाखालीच बसेल बाकी मेहता बिहता नी चड्डीत राहायचं.तूर्तास एवढंच, असं ट्विट मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलयं आहे.
नेमकं प्रकरण काय?
मीरा भाईंदर येथील जोधपूर स्वीट्स व्यावसायिकावर मराठी भाषेवरून झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ संपूर्ण मारवाडी समाज (३६ समुदाय) आणि व्यावसायिक संघटनांनी ३ जुलै रोजी बंदची हाक दिली आहे. हा बंद सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत होता. सर्व व्यापाऱ्यांना त्यांचे आस्थापने बंद ठेवून या शांततापूर्ण निषेधात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परिणामी 3 जुलैला मीरा रोडवरील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. याचदरम्यान व्यापारी रस्त्यावर उतरून काहींनी रस्त्यावर या कृत्याविरुद्ध घोषणाबाजी केली. कडक कारवाई न केल्यास ते त्यांचे आंदोलन आणखी तीव्र करतील असे व्यापाऱ्यांनी सांगितले. मुंबईतील मारवाडी संघटनांनीही या बंदला पाठिंबा दिला आहे. व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की जर आज या निंदनीय घटनेवर कठोर कारवाई केली नाही तर भविष्यात कोणत्याही व्यावसायिकावर असे होऊ शकते.
एकीकडे मीरा रोड येथील मारवाडी व्यावसायिकावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेवरून गुरुवारी बंदची हाक देण्यात आली आहे, तर दुसरीकडे भाजप आणि शिंदे सेनेने या घटनेचा निषेध केला आहे. हिंदी भाषिक नेत्यांनी भाषेच्या नावाखाली मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. नेत्यांनी सांगितले की मराठी शिकणे आवश्यक आहे कारण त्यामुळे लोकांना फायदा होईल, परंतु हल्ला करणे योग्य नाही.
नितेश राणे यांचे विधान होते
भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी वादग्रस्त विधान केले होते की, 'गरीब हिंदूंवर हात उचलणाऱ्यांनी नाल बाजार आणि मोहम्मद अली रोडवर जाऊन जिहादींना मारहाण करण्याचे धाडस दाखवावे. जावेद अख्तर, आमिर खान सारखे लोक मराठी बोलतात का? हे लोक नेहमीच गरीब हिंदूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात, परंतु मराठी बोलण्याशी किंवा मराठी संस्कृतीशी त्यांचा काहीही संबंध नाही.'
या प्रकरणी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी भाजप मंत्री नितेश राणे यांच्या अलीकडील विधानावर प्रत्युत्तर देत म्हटले आहे की, 'नितेश राणे यांनी हे समजून घ्यावे की आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही.', आम्हाला या बॅनर्स आणि पोस्टर्सबद्दल काहीही माहिती नाही, ही आमच्या पक्षाची ओळ नाही. आम्ही फक्त मराठी माणसांचा विजय साजरा करणार आहोत.'
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.