Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'महादेवी' वनताराला सुपूर्द; संतप्त जमावाची दगडफेक

'महादेवी' वनताराला सुपूर्द; संतप्त जमावाची दगडफेक


जयसिंगपूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील जैन मठाच्या 'महादेवी' हत्तिणीचा अखेर गुजरातमधील 'वनतारा'मध्ये जाण्याचा मार्ग मोकळा झाला.


मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात नांदणी मठाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मठाची याचिका सर्वोच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आली. दरम्यान, सोमवारी 'महादेवी'ला वनताराच्या अधिकार्‍यांकडे सुपूर्द करताना संतप्त जमावाने दगडफेक केल्याने दोन पोलिस वाहनांचे नुकसान झाले. पोलिसांनी लाठीमार करून जमाव नियंत्रणात आणला.

'महादेवी'ला वनताराकडे पाठवू नये, यासाठी नांदणी परिसरातील ग्रामस्थ आक्रमक आहेत. असे असताना पोलिसांनी पुरेसा बंदोबस्त ठेवण्याची गरज होती. मात्र, तुटपुंजा बंदोबस्त असल्याने जमाव आक्रमक झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्याने मठाधिपती जिनसेन भट्टारक पट्टाचार्य यांनी न्यायालयाचा निर्णय मान्य असल्याचे सांगत अधिक प्रतिक्रिया दिली नाही.

गावातून भव्य मिरवणूक काढून गुजरातमधील 'वनतारा' केंद्राकडे पाठवले

आमच्या 'महादेवी'ला कसे पाठवायचे? तब्बल 35 वर्षे आम्ही तिला सांभाळले आहे. इथल्या प्रत्येकाशी तिची भावनिक नाळ जोडली गेली आहे... हे शब्द उच्चारताना नांदणी येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्यासह उपस्थित हजारो नागरिकांच्या अश्रूंचा बांध फुटला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, सोमवारी रात्री नांदणी मठाची लाडकी हत्तीण 'माधुरी' ऊर्फ 'महादेवी' हिला गुजरातमधील 'वनतारा' या प्राणी कल्याण केंद्राकडे सुपूर्द करण्यात आले. हा निरोपाचा क्षण अत्यंत भावनिक आणि हृदयद्रावक होता.

नांदणी मठाच्या 'महादेवी' हत्तीणीला प्राण्यांच्या हक्कांसाठी काम करणार्‍या संस्थेच्या याचिकेवरून गुजरात येथील जामनगर जिल्ह्यातील वनतारा राधेकृष्ण मंदिर हत्ती कल्याण ट्रस्टच्या विशेष केंद्रात पाठवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. या निर्णयाविरोधात नांदणी मठाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, सोमवारी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत मठाची याचिका फेटाळून लावली. त्यामुळे 'महादेवी'ला वनताराला पाठवण्याचा मार्ग मोकळा झाला. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येताच पोलिस उपअधीक्षक डॉ. रोहिणी सोळंके आणि पोलिस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी मठात जाऊन न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याची विनंती केली. मठाने न्यायालयाचा आदर करत 'महादेवी'च्या बिदाईचे धार्मिक विधी आणि गावातून मिरवणूक काढून तिला सुपूर्द करण्याची तयारी दर्शवली.

'महादेवी' जाणार ही बातमी पंचक्रोशीत वार्‍यासारखी पसरताच हजारो नागरिकांनी नांदणीकडे धाव घेतली. निशिधी येथून 'महादेवी'ला मठात आणण्यात आले. तिथे धार्मिक विधी पार पडल्यानंतर तिची गावातील प्रमुख मार्गांवरून भव्य मिरवणूक काढण्यात आली. 'महादेवी' आपल्याला सोडून जाणार या कल्पनेनेच अनेक महिला भावुक झाल्या होत्या. त्यांनी हत्तीणीच्या पायावर पाणी घालून तिचे औक्षण केले आणि अश्रूंना वाट मोकळी करून दिली. या प्रचंड जनसमुदायाच्या साक्षीने निघालेली मिरवणूक अखेर निशिधी येथे पोहोचली, जिथे 'वनतारा' पथकाच्या विशेष वाहनातून 'महादेवी' नव्या प्रवासासाठी मार्गस्थ झाली. 35 वर्षे नांदणीच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या 'महादेवी'च्या जाण्याने गावात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. नांदणीकरांसाठी हा भावनिक धक्का असला तरी 'महादेवी'च्या भावी आयुष्यासाठी उचललेले हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

अश्रूंचा बांध फोडणारी मिरवणूक

नांदणी गावासाठी हत्तीची मिरवणूक ही बाब नवीन नाही. प्रत्येक पूजा कार्यक्रमात हत्तीची नेहमीच मिरवणूक होत असते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हत्तीणीला गुजरात येथे पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे ही मिरवणूक सर्वांसाठीच अत्यंत दु:खद होती. कारण ती नांदणी सोडून जात असताना हजारो जनसमुदायाचा अश्रूचा बांध फोडणारी ठरली.

शांततेचे आवाहन

हत्तीची बिदाई करत असताना आम्ही हत्ती देणार नाही. हत्ती आमच्या मठाचा आहे, असे म्हणत अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत घोषणाबाजी केली. यावर महास्वामींनी तातडीने युवकांना शांततेचे आवाहन केले.

तिच्याही डोळ्यांतून वाहिले अश्रू

महादेवी हत्तीणीचा गेल्या 35 वर्षांपासून नांदणी मठांतर्गत असलेल्या गावकर्‍यांना लळा लागला आहे. हत्ती वनताराकडे पाठवायचा याची कल्पनाच अनेकांना करवत नव्हती. निशिधीमधून सोमवारी महादेवीला मठाकडे आणताना तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्यामुळे सर्वांनाच अश्रू अनावर झाले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.