अमेरिकिचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के टॅरिफ लादण्याचा निर्णय जाहिर केला आहे. भारतीय वस्तूंवरील हा कर १ ऑगस्टपासून लागू होणार आहे. यादरम्यान व्हाईट हाऊसचे आर्थिक सल्लागार यांनी बुधवारी मोठं विधान केलं आहे. भारताबरोबरच्या व्यापार चर्चेत प्रगती न झाल्याने डोनाल्ड ट्रम्प निराश झाले आहेत आणि २५ टक्के टॅरिफ लावल्याने ही परिस्थिती हाताळली जाईल आणि त्यावर उपाय केले जातील असे त्यांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी स्वतःहून घालून दिलेल्या मुदतीच्या आधी वॉशिंग्टन आणि नवी दिल्ली यांच्यात अंतरिम व्यापर कराराला अंतिम स्वरूप देण्यात अपयश आलं, यानंतर ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
व्यापार करार व्हावा यासाठी भारत आणि अमेरिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये वाटाघाटींच्या अनेक फेऱ्या झाल्या मात्र काही वादाच्या मुद्द्यावर दोन्ही देशांमध्ये एकवाक्यता होऊ शकली नाही, यामुळे दोन्ही देशांमधील करार रखडला आहे. “भारत अशी बाजारपेठ राहिला आहे जी अमेरिकन उत्पादनासाठी बऱ्यापैकी बंद आहे आणि आमची बाजारपेठ त्यांच्यांसाठी खुली आहे. आणि मला वाटतं की अध्यक्ष ट्रम्प हे भारताबरोबर केलेल्या प्रगती पाहून निराश आहेत, पण मला वाटते की २५ टक्के टॅरिफ लादल्याने परिस्थिती हाताळली जाईल आणि त्यावर उपाय केले जातील जे अमेरिकन लोकांसाठी चांगले असेल,” असे व्हाईट हाऊसचे आर्थिक सल्लागार केविन हॅसेट म्हणाले.
भारत आणि अमेरिका यांच्यात अंतरिम व्यापार करार होऊ न शकल्यानंतर ट्रम्प यांनी हा निर्णय जाहीर केला आहे, तसेच वाटाघाटी करणाऱ्यांना चर्चेत मिळालेल्या यशावर ट्रम्प असमाधानी असल्याचे सांगितले जात आहे. बाजारपेठेतील त्यांचा हिस्सा टिकवून ठेवण्यासाठी भारत हा अमेरिकेसाठी त्यांच्या किमती कमी करेल, आगामी काळात हे होणार आहे, असेही हॅसेट म्हणाले. “त्यानंतर ते त्यांच्या कृतीचा पुनर्विचार करतील, ज्यामुळे हे शुल्क वाढवले आहे. आणि पुढील काळात, माझा अंदाज आहे की भारतीय कंपन्या या अमेरिकेत उत्पादन करतील आणि कदाचित भारतीय आमच्यासाठी अधिक खुल्या करतील, जेणेकरून आम्ही भविष्यातील व्यापार करारावर पुनर्विचार करू.”अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के आयात शुल्क लागू करणार असल्याची घोषणा बुधवारी केली. शिवाय रशियाकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि इंधन खरेदी करत असल्याबद्दल भारताला 'दंड'देखील होणार असल्याचे त्यांनी म्हटले असले, तरी तो नेमका किती असेल, हे स्पष्ट केलेले नाही. ट्रम्प यांच्या या घोषणेवर केंद्र सरकारकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.