Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कोल्हापुरात लोकनियुक्त सरपंचांना हटवण्यासाठी संपूर्ण गावाने मतदान केलं, अन् अविश्वास ठराव आणला.

कोल्हापुरात लोकनियुक्त सरपंचांना हटवण्यासाठी संपूर्ण गावाने मतदान केलं, अन् अविश्वास ठराव आणला.
 

कसबा बीड येथील लोकनियुक्त सरपंच व कुंभी कारखाना संचालक उत्तम वरुटे यांच्यावर दाखल केलेला अविश्वास ठराव ३२८ मताधिक्‍क्‍याने मंजूर झाला. आज झालेल्या ग्रामसभेत चुरशीने मतदान होऊन ठरावाच्या बाजूने १०४१, तर ठरावाच्या विरोधात ७१३ मते पडली. ५५ मते बाद झाली. यामुळे येथील सरपंचपद रिक्त झाले आहे. निवडणूक अधिकारी म्हणून करवीरचे गटविकास अधिकारी संदीप भंडारे यांनी काम पाहिले. आज सकाळी ८ ते ११ या वेळेत ग्रामसभेला सुरुवात झाली. यावेळी १८३४ मतदार उपस्थित होते. एवढ्याच मतदारांना ११ ते ४ या वेळेत मतदानाचा अधिकार मिळाला. मतमोजणी मतदान केंद्रावरच झाली. या प्रक्रियेत पंचायत समितीचे ग्रामपंचायत विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते.

येथील ग्रामपंचायत निवडणूक डिसेंबर २०२२ मध्ये झाली आहे. या निवडणुकीत करवीरचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी व गोकुळचे माजी संचालक सत्यजित पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने दहा जागा जिंकल्या होत्या. पण, सरपंच पद गमावले होते, तर कुंभीचे संचालक उत्तम वरूटे, पांडुरंग विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष अमित वरुटे, कुंभीचे माजी संचालक शैलेश वरुटे, पंडित वरुटे यांच्या आघाडीचा एक सदस्य व सरपंच पदाचे उमेदवार उत्तम वरुटे निवडून आले होते.

गेल्या अडीच वर्षांपासून सरपंच व सदस्यांमध्ये कामामध्ये समन्वय नव्हता. त्यामुळे सर्व अकरा सदस्यांनी अविश्वास ठराव आणला होता. यावेळी अनुचित प्रकार घडू नये, यासाठी करवीरचे पोलिस निरीक्षक किशोर शिंदे फौजफाट्यासह दिवसभर तळ ठोकून होते. तसेच तालुका पंचायत अधिकारी डॉ. संदेश भोईटे व कर्मचारी उपस्थित होते.

निकराची झुंज

सरपंच उत्तम वरुटे यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यासाठी विरोधातील तसेच त्यांच्या गटातील प्रमुख नेते मंडळी त्यांच्या विरोधात गेली होती, तरीही सरपंच उत्तम वरुटे यांनी निकराची झुंज दिली. त्यांना पडलेली लक्षणीय मते गावातील नेते मंडळींना विचार करायला लावणारी आहेत.

भागातील चौथी घटना
लोकनियुक्त सरपंचांवर अविश्वास ठराव आणण्याची परिसरातील ही चौथी घटना आहे. सावरवाडी येथे जिल्ह्यातील पहिला अविश्वास ठराव दाखल झाला होता. यामध्ये विद्यमान सरपंचांच्या बाजूने मतदान झाले होते. हिरवडे दुमालामध्ये ही याची पुनरावृत्ती झाली होती, तर बहिरेश्वर व कसबा बीडमध्ये मात्र अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान झाले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.