Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

निलेश राणेंना शासकीय कार्यालयात बंदी, थेट जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश

निलेश राणेंना शासकीय कार्यालयात बंदी, थेट जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश
 

जळगाव: जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील माजी नगराध्यक्ष व भाजपचे पदाधिकारी निलेश राणे यांना दोन महिने शासकीय कार्यालयात बंदी घालण्यात आली असून फैजपूर येथील उपविभागीय दंडाधिकारी बबन काकडे यांना धमकावल्याने तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ चित्रीकरण केल्याच्या कारणावरून नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 कायद्याचा वापर करत प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी जयश्री माळी यांनी हे आदेश काढले आहेत.
फैजपूरचे माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे पदाधिकारी निलेश राणे यांनी 16 जुलै रोजी उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयात जाऊन मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या तक्रारीवरून उपविभागीय दंडाधिकारी बबन काकडे यांना धमकावले होते. व त्याच्या आदल्या दिवशी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ चित्रीकरण केल्याने खळबळ उडाली होती. यावरून महसूल कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत निलेश राणे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली होती.
या अनुषंगाने प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी जयश्री माळी यांनी निलेश मुरलीधर राणे यांना 19 जुलै ते 16 सप्टेंबर 2025 या दोन महिन्याच्या कालावधीसाठी जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय मुख्यालय व शासकीय कार्यालयांमध्ये बंदी घालण्यात आली असून या कालावधीमध्ये निलेश राणे यांना कोणतीही तक्रार करायची असल्यास शासकीय कार्यालयामध्ये न जाता ऑनलाईन तक्रार करता येणार येणार असून तक्रारीच्या सुनावणीसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे उपस्थित राहता येणार आहे.

दोन महिन्याच्या कालावधीत 1 तास शासकीय कार्यालयात उपस्थित राहता येणार
माजी नगराध्यक्ष निलेश राणे यांना दोन महिने शासकीय कार्यालयात बंदी घालण्यात आली असली तरी मात्र या दोन महिन्याच्या कालावधीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यास व त्यासाठी निलेश राणे यांना उमेदवारी दाखल करायची असल्यास 1 तास शासकीय कार्यालयात उपस्थित राहण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने निलेश राणे यांच्यावर शासकीय कार्यालयात बंदीची कारवाई करण्यात आली असली तरी मात्र निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुभा मिळाल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.
 



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.