महाराष्ट्र, कर्नाटकातील जैन समाजाच्या ७४८ गावात प्रिय असणारा नांदणी मठाचा हत्ती जाणार अंबानींच्या जंगलात, काय आहे कारण?
नांदणी (ता. शिरोळ) येथील प. पू. स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठातील महादेवी हत्तीणीला दोन आठवड्यांत गुजरातच्या जामनगरमधील राधेकृष्ण मंदिर हत्ती कल्याण ट्रस्टच्या विशेष हत्ती कल्याण केंद्रात पाठविण्याचे सूचित करण्यात आले होते. मात्र, मठ संस्थानने सुप्रीम कोर्टात धाव घेऊन हात्तीण नांदणी मठाकडे राहण्यासाठी सोमवारी (ता. २१) याचिका दाखल केली आहे.
प्राण्यांच्या हक्काला प्राधान्य द्यावे लागेल, असे निरीक्षण नोंदविताना मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी नांदणी येथील 'महादेवी हात्तीणी'ला गुजरातच्या जामनगरमधील राधेकृष्ण मंदिर हत्ती कल्याण ट्रस्टच्या विशेष हत्ती कल्याण केंद्रात पाठविण्याचे आदेश दिले होते. या आदेशावर महादेवी हत्तीण नांदणी मठाकडे राहण्यासाठी सोमवारी याचिका दाखल केली. वनविभागाची परवानगी न घेता मिरवणुकीत या हात्तीणीला सहभागी केल्याचा आरोप प्राणी हक्कासाठी लढणाऱ्या 'पेटा' संघटनेने केला होता. न्यायालयाने याची चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या उच्चाधिकार समितीने जून आणि नोव्हेंबर २०२४ मध्ये हत्तीणीच्या तपासण्या करून अहवाल सादर केला होता.दरम्यान, नांदणी येथे महाराष्ट्र व कर्नाटक सीमाभागातील जैन समाजाच्या ७४८ गावांचा पुरातन मठ आहे. मठाचा अनेक वर्षांचा इतिहास आहे. मठामध्ये प. पू. स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी या मठाचे मठाधिपती म्हणून कार्यरत आहेत. गेल्या अनेक दशकांपासून परंपरागतरीत्या या मठामध्ये हत्तीण सांभाळली जाते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.