सध्याच्या डिजिटल युगात फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. बऱ्याच लोकांच्या कागदपत्रांचा गैरवापर होत असल्याचे समोर आळे आहे. सायबर चोर तुमच्या पॅन कार्डचाही गैरवापर करू शकतात आणि तुमच्या नावावर कर्जही घेऊ शकतात. यामुळे तुम्ही अडचणीत सापडू शकता. मात्र तुमच्या पॅनकार्डवर एखाद्याने कर्ज तर घेतले असेल तर ते कसे तपासायचे आणि त्याची तक्रार कुठे करायची ते जाणून घेऊयात.
क्रेडिट रिपोर्ट चेक करा
तुमच्या पॅन कार्डवर कोणते कर्ज आहे हे क्रेडिट रिपोर्टमधून समोर येते. त्यामुळे सतत क्रेडिट रिपोर्ट तपासत रहा. यात CIBIL, Experian, Equifax आणि CRIF High Mark हे क्रेडिट ब्युरो असतात. जे तुमच्या नावावर घेतलेल्या प्रत्येक कर्जाची माहिती साठवून ठेवतात. क्रेडिट रिपोर्ट देणाऱ्या वेबसाइटला भेट द्या. पॅन नंबर आणि मोबाईल नंबर टाकून क्रेडिट रिपोर्ट मिळवा. यात तुम्हाला तुम्ही घेतलेली सर्व कर्जे आणि क्रेडिट कार्डची माहिती मिळेल.
क्रेडिट रिपोर्टमध्ये तुमच्या पॅनकार्डवरील लोनची माहिती मिळेल
तुमच्या क्रेडिट रिपोर्टमध्ये पॅनकार्डवर एखादे असे लोन दिसत असेल ज्यासाठी तुम्ही कधीही अर्ज केला नाही, तर तुमच्या पॅनकार्डचा गैरवापर झाल्याचे सिद्ध होते. तसेच त्या कर्जाच्या डिटेल्समध्ये चुकीचा खाते क्रमांक, अज्ञात बँकेचे किंवा कर्ज देणाऱ्याचे नाव दिसत असेल तर वेळीच सावध व्हा. अन्यथा तुम्हाला मोठा फटका बसू शकतो.
तुमच्या नावावर बनावट कर्ज असेल तर काय करायचे?
क्रेडिट रिपोर्टमध्ये बनावट कर्ज दिसत असेल तर घाबरू नका. ज्या संस्थेने कर्ज दिले आहे, त्याच्याशी संपर्क साधा आणि या कर्जाबाबत माहिती सांगा. यासाठी तुम्हाला तुमची माहिती विचारली जाईल आणि तसेच कर्जाचा तपशील आणि सही असलेले एक प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल. यानंतर पोलिस स्टेशनच्या सायबर क्राइम सेलमध्ये तक्रार दाखल करा. पॅन कार्डचा गैरवापर झाल्याचा पुरावा द्या. यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर सुरक्षित राहील आणि आरोपीला पकडण्यात मदत होईल.
पॅन कार्ड सुरक्षित कसे ठेवायचे?
तुमचा पॅन कार्ड नंबर कधीही अज्ञात वेबसाइट, अॅप किंवा व्हॉट्सअॅप मेसेजवर शेअर करू नका. तुमचे पॅन कार्ड हरवले असेल, तर ताबडतोब ते पुन्हा मिळवण्यासाठी अर्ज करा आणि क्रेडिट रिपोर्टवर लक्ष ठेवा. ऑनलाईन बँकिंगसाठी मोठा पासवर्ड वापरा. यामुळे तुमचे खाते सुरक्षित राहील.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.