हनी ट्रॅपमध्ये ४ मंत्री, मुख्यमंत्र्यांना सगळी माहिती; भाजप महिला नेत्यावरही निशाणा, खासदारानं उघडले सगळे पत्ते
राज्याच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान सत्ताधारी नेत्यांवर अनेक गंभीर आरोपांची मालिका समोर येत आहे. रामदास कदम यांचं डान्सबार प्रकरण, जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्यातील वाद, आणि आता हनी ट्रॅप. या प्रकरणांमुळे राज्यातील राजकारणाचं वातावरण ढवळून निघालं आहे. याच मुद्द्यावर प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकार आणि भाजप नेत्यांवर गंभीर आरोप करत निशाणा साधला.
सरकार नसून गुंडांची टोळी
'राज्यात फडणवीसांचं जे सरकार आहे, ते सरकार नसून गुंडांची टोळी आहे. मुख्यमंत्री छातीठोकपणे हे करीन, ते करीन, याला सरळ करीन, त्याला करीन, असं म्हणत आहेत. भ्रष्टाचाऱ्यांना तुरूंगात टाकीन. पण असं काही घडताना दिसून येत नाहीये. इतका हतबल मुख्यमंत्री महाराष्ट्रानं आजपर्यंत पाहिलेला नाही', अशी टीका संजय राऊतांनी केली. 'अशा प्रकारचं सरकार हे राज्याला कलंकीत करणारं सरकार आहे', असंही राऊत म्हणाले. 'आमदार, मंत्री ज्या प्रकारचं वर्तन करत आहेत, ते याआधी राज्यानं कधीच पाहिलं नव्हतं. काल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर छावा संघटनेच्या राज्यप्रमुखावर हल्ला करण्यात आला. आमदार निवासात मारामाऱ्या होत आहेत. दुसरीकडे हनी ट्रॅपचं प्रकरण सुरुये', असंही राऊत म्हणाले.
भाजप महिला कुठे आहेत?
'मंत्र्यांच्या बारमधून बारबाला पकडल्या जात आहेत. कुठे गेल्या भाजपच्या फडफडणाऱ्या महिला नेत्या. विरोधी पक्षांच्या नेत्यांवर गुन्हे, आरोप झाले की, याच महिला नेत्या पुढे येतात. आज कुठे आहेत? महिलांवर अत्याचार वाढले आहेत', असंही राऊत म्हणाले आहेत.
हनी ट्र्रॅपबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती
'देवेंद्र फडणवीस खोटं बोलत आहेत. चार मंत्री हनी ट्रॅपच्या कचाट्यात सापडले आहेत. विजय वडेट्टीवारांनी याबाबत थोडी माहिती दिली. आता या संदर्भात मी पूर्ण माहिती देणार', असंही राऊत म्हणालेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.