महिलांसाठी खुशखबर ! 'महिलांना एक रुपयाही न भरता मिळणार ई-पिंक रिक्षा'; अर्जासाठी १५ ऑगस्टपर्यंत मुदत
सोलापूर : महिलांना स्वयंरोजगाराची संधी मिळावी आणि कामाच्या ठिकाणी जाणाऱ्या महिलांना सुरक्षितपणे प्रवास करता यावा, या हेतूने राज्य सरकारने ई-पिंक रिक्षा योजना जाहीर केली. रिक्षाच्या एकूण किमतीपैकी २० टक्के अनुदान राज्य सरकारकडून तर १० टक्के रक्कम लाभार्थी महिलेस आणि उर्वरित ७० टक्के रक्कम बॅंकाकडून कर्ज रूपात देणारी योजना आहे. मात्र, आता लाभार्थी महिलांना द्यावा लागणारा १० टक्के हिस्सा देखील माफ करण्यात आला आहे. त्यामुळे स्वत:कडील एक रुपयाही न भरता महिलांना ई-पिंक रिक्षा मिळणार आहे.
महिलांना स्वयंरोजगार निर्मितीत मदत करण्यासाठी महिला व बालविकास विभागांतर्गत ही योजना राबविली जात आहे. या रिक्षाची एकूण किंमत साधारणत: तीन लाख ७३ हजार रुपये असून त्यातील ३० टक्के रक्कम माफ असणार आहे. दोन लाख ६२ हजार रुपयांत पिंक रिक्षा मिळणार आहे. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील सुमारे ६९० महिलांनी ई-पिंक रिक्षासाठी अर्ज केले, पण त्यातील काहींचा 'सिबिल स्कोअर' खराब असल्याने त्यांना बॅंकांकडून कर्ज मिळणे कठीण आहे. ज्या महिला ई-पिंक रिक्षासाठी पात्र ठरल्या आहेत, त्या महिला रिक्षा चालविण्याच्या प्रशिक्षणासाठी तयार नसल्याचे अधिकारी सांगतात. अर्ज करूनही महिला पुढे येत नसल्याने लाभार्थीस द्यावी लागणारी १० टक्के रक्कम माफ करण्यात आली आहे.
नेमकी काय आहे पिंक ई-रिक्षा योजना?
पिंक ई-रिक्षा योजना ही महिलांना आर्थिक स्वातंत्र्य आणि सुरक्षित रोजगाराची संधी देण्यासाठी डिझाइन केलेली आहे. महिलांसाठी स्वयंरोजगार निर्मिती आणि आर्थिकदृष्ट्या मागास महिलांना योजनेच्या माध्यमातून स्वावलंबी बनवण्याचे उद्दिष्ट आहे. याशिवाय महिला प्रवाशांसाठी आणि रिक्षा चालवणाऱ्या महिलांसाठी सुरक्षित पर्याय उपलब्ध करणे आणि इलेक्ट्रिक व प्रदूषणमुक्त रिक्षाच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षण करणे हेही योजनेचे उद्दिष्टे आहे. या योजनेअंतर्गत महिलांना पिंक ई-रिक्षा खरेदी करण्यासाठी आर्थिक साहाय्य दिले जाते. यामुळे त्यांना किफायतशीर दरात रिक्षा मिळते.ई-पिंक रिक्षासाठी पात्र ठरलेल्या महिलांना आरटीओकडून परवाना घेऊन मोफत प्रशिक्षण पूर्ण करावे लागणार आहे. त्यानंतर सिबिल स्कोअर पाहून त्या लाभार्थी महिलांचे अर्ज कर्जासाठी बॅंकांमध्ये पाठविले जातील. आता महिला लाभार्थींना भरावयाची १० टक्के रक्कम देखील माफ करण्यात आली असून १५ ऑगस्टपर्यंत जास्तीत जास्त महिलांनी आमच्या कार्यालयाकडे पिंक रिक्षांसाठी अर्ज करावेत.- रमेश काटकर, महिला व बालविकास अधिकारी, सोलापूर
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.