'केम छो एकनाथ शिंदे साहेब', जय गुजरात'नंतर राज्यात नवा वाद
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात जय गुजरात अशी घोषणा केल्यामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. एकिकडे राज्यात मराठी भाषेचा मुद्दा उपस्थित झाला असतानाच उपमुख्यमंत्री शिंदेंनी ही घोषणा करत विरोधकांच्या हातात आयते कुलीत दिले.
एकनाथ शिंदे यांच्या घोषणेवरून शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीकास्त्र सोडले आहे.
आज पुण्यातील कोंढवा कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना शिंदे यांनी 'जय हिंद, जय महाराष्ट्र', आणि नंतर जय गुजरात असा नारा दिला. त्याच्या या नाऱ्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
नो मराठी नो वोटिंग, हा ट्रेंड आता आम्हाला चालवावा लागणार
शिंदेंच्या नाऱ्यानंतर सुषमा अंधारे यांनी संताप व्यक्त केला आहे. जे या प्रदेशाच्या अस्मितेला नख लावण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्याशी आपण कसं वर्तन व्यवहार ठेवायचं, हे इथल्या मराठी जनतेला ठरवावे लागेल. भाजपने ज्या पद्धतीने नो हिंदी नो बिझनेस, असा ट्रेंड चालवला. आता इथल्या मराठी माणसाने नो मराठी नो कॉपोरेशन, नो मराठी नो बिझनेस, नो मराठी नो कनेक्शन, नो मराठी नो वोटिंग, हा ट्रेंड आता आम्हाला चालवावा लागणार आहे आणि आता तो प्रत्येक मराठी माणसाला चालवावा लागणार आहे. अशा शब्दात अंधारे यांनी संताप व्यक्त केला आहे.
तसेच त्या पुढे म्हणाल्या, महाराष्ट्र द्रोही निर्णय घेऊन महाराष्ट्राच्या अस्मिता दिल्लीश्वरांच्या पायथ्याशी वाहिल्यानंतर त्यांना मुख्यमंत्रीपदाचे बक्षीस मिळाले आहे. त्यामुळे ते बक्षीस मिळाल्याने आपण सगळ्यात अतिउत्तम लाचार कसा? हे दाखवण्याची स्पर्धा सुरू झालेली आहे. ज्या पद्धतीने अजित पवारांनी सर्व ताब्यात घेतलेले आहे आणि एका अर्थाने शिंदे हे बऱ्यापैकी वेगळे झालेले आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा प्रवाहात येण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्यांना हे सगळं बोलणे गरजेचे आहे. अशा शब्दात अंधारे यांनी शिंदेंना खडेबोल सुनावले.
तर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आता शिंदे साहेबांसोबत कसं बोलायचं? केम छो एकनाथ शिंदे साहेब, असं म्हणत डिवचलं आहे. विनाशकाले विपरीत बुद्धी. शिवसेना मराठी माणसासाठी उभी केली होती. या सगळ्यातून एकच म्हणावं वाटतं विनाशकाले विपरीत बुद्धी असंही पुढे ते म्हणालेत.
तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? असा सवाल उपस्थित केला आहे.
भाषणादरम्यान एकनाथ शिंदे नेमकं म्हणाले?
पुण्यातील कोंढवा कन्व्हेंशन सेंटरमधील कार्यक्रमात केंद्रीय मंत्री अमित शाह उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांचे तोंडभरुन कौतुक केले. अनेक राजकीय घटनांचा खुलासा त्यांनी यावेळी केला. दरम्यान, भाषणाच्या शेवटी 'जय हिंद, जय महाराष्ट्र', असे म्हटले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांना काहीतरी आठवले आणि त्यांनी पुन्हा माईकपाशी येऊन 'जय गुजरात', असे म्हटले. एकनाथ शिंदे यांच्या या गुजरातच्या उल्लेखावरुन प्रचंड मोठा राजकीय वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.