बँकेवर इतका मोठा दरोडा पडला की रक्कम ऐकून पोलिसही चक्रावून गेले होते. तब्बल ५३.२६ कोटी रुपये बँकेतून लुटण्यात आले होते. यात रोख रक्कम फक्त पाच लाख होती. पण, चोरट्यांनी सोन्यावरच डल्ला मारला होता.
बँकेच्या शाखेतून तब्बल ५९ किलो सोनंचोरीला गेलं होतं. मे महिन्यात कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यात ही घटना घडली होती. त्याचा तपास करताना अखेर खरा आरोपी शोधण्यात पोलिसांना यश आले. ५३.२६ कोटी लुटण्याच्या प्लॅनमधील मुख्य सूत्रधार बँक शाखेतील मॅनेजरच निघाला आहे. कर्नाटक पोलिसांनी या प्रकरणामध्ये बँकेचा मॅनेजर विजयकुमार मिरियाल याच्यासह तीन जणांना अटक केली आहे. बँक मॅनेजरनेच लूट करण्याचा कट रचला आणि दागिने, पैसे चोरले. २३ ते २५ मे दरम्यान मणगुली गावातील कॅनरा बँकेच्या शाखेत ही चोरी झाली होती. आरोपींनी चोरी करताना पुरावे राहू नये म्हणून वीज पुरवठा खंडित केला. त्यानंतर सीसीटीव्ही यंत्रणेच्या ताराही कापल्या. आरोपींनी खिडकीला लावलेली जाळी बाजूला काढली आणि लॉकरमध्ये ठेवलेले सोने आणि पैसे घेऊन फरार झाले होते.
अनेक महिन्यांपूर्वी बनवला होता कट
पोलिसांनी केलेल्या तपासातून अशी माहिती समोर आली की, बँकेतून पैसे-दागिने चोरी करण्याचा प्लॅन अतिशय सावधपणे तयार करण्यात आला होता. विजयकुमारने बँकेतीलच सेवानिवृत्त कर्मचारी चंद्रशेखर नेरेला , तो आता ठेकेदार आहे आणि एक कसिनोही चालवतो. नेरेलाला या कटात सहभागी करून घेतले होते. पोलिसांनी श्वानांच्या मदतीने आरोपींचा माग काढण्याचा प्रयत्न केला. पण, आरोपींनी मिरची पावडर परिसरात पसरली होती, जेणेकरून श्वान माग काढू शकणार नाही. इतकंच नाही, तर आरोपींनी काळ्या जादूशी संबंधित काही सामानही तिथेच ठेवले होते.
चोरी करण्यासाठी चित्रपट बघितले
ही चोरी करण्यापूर्वी आरोपींनी अनेक हॉलिवूड आणि बॉलिवूड सिनेमे बघितले. सगळे सिनेमे चोरी करण्याशी संबंधित होते. यात कोणते कपडे घालायचे, कोणते मास्क असले पाहिजे, हेल्मेटचा वापर कसा करायचा याबद्दलची माहिती चोरट्यांनी मिळवली होती. विजयपूरचे पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबर्गी यांनी सांगितले की, बँकेवर दरोडा टाकण्याची योजना अनेक महिन्यांपूर्वी तयार करण्यात आली होती. आरोपींनी बँक शाखा आणि परिसराची अनेकदा रेकी केली होती. आरोपी विजयकुमार हा ९ मे पर्यंत याच शाखेत मॅनेजर म्हणून काम करत होता. त्याची बदली रोनिहाल येथील शाखेत झाली होती. आरोपीने बँकेच्या लॉकरच्या डुप्लिकेट चाव्या आधीच बनवून घेतल्या होत्या. अनेकदा त्यांनी चाव्या वापरून बघितल्या. त्यातील एका चावीने लॉकर उघडले. त्यानंतर त्यांनी लूट करण्याचा प्लॅन सुरू केला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.