नवी मुंबईत राजकीय घडामोडींना वेग; अजित पवार गट महायुतीतून बाहेर पडणार?
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केलीय. महायुती आणि महाआघाडीमध्येही राजकीय हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीकडून तयारी सुरू झाली असून, शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यात महत्वाची बैठक पार पडली.
मात्र या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला निमंत्रण देण्यात आलं नव्हतं. त्यामुळे त्यांच्यात नाराजीचा सूर उमटला आहे.
अजित पवार गटाने नवी मुंबईत महायुतीसाठी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये सक्रियपणे काम केलं होतं. मात्र, सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भातील निर्णय प्रक्रियेत त्यांना डावलले जात आहे, अशी भावना अजित पवार गटातील नेत्यांनी व्यक्त केली.
आमदार, खासदार आणि मंत्र्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी फोनही उचलले नाहीत, असा आरोप अजित पवार गटातील नेत्यांकडून करण्यात आला. त्यामुळे त्यांची नाराजी उघडपणे दिसून आली.
डावल्याची भावना मनात आल्यानंतर अजित पवार गटाने नवी मुंबईत एक स्वतंत्र बैठक घेतली. या बैठकीत पुढील राजकीय दिशा आणि भूमिका यावर चर्चा झाली. यावेळी नवी मुंबईत महायुतीतून बाहेर पडण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. जर अजित पवार गट खरोखरंच महायुतीतून बाहेर पडला, तर नवी मुंबईच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.