सांगलीत शहीद स्मारक येथे कारगिल विजय दिवस साजरा
सांगली 26 जुलै 2025:- सांगलीत शनिवारी कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. येथील त्रिकोणी बागेजवळील शहीद स्मारकावर शहिदांना अभिवादन करण्यात आले. कारगिल युद्धात प्राण अर्पण केलेल्या वीर जवानांच्या स्मृतीला उजाळा देत त्यांना पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली. 'जय हिंद', 'शहीद अमर रहे', अशा घोषणा देत तिरंगा रॅली काढण्यात आली.
आमदार सुधीर गाडगीळ आणि शौर्यचक्र विजेते विंग कमांडर प्रकाश नवले (नि.) यांच्याहस्ते शहीद स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन भारतीय माजी सैनिक संघटननेच्या जिल्हा शाखेतर्फे करण्यात आले. यावेळी संघटनेचे विभागीय उपाध्यक्ष (पश्चिम महाराष्ट्र) सुभेदार मेजर रमेश चव्हाण (नि.) तसेच भारतीय माजी सैनिक संघटनेचे जिल्हा पदाधिकारी पांडुरंग भोसले, संपतराव निंबाळकर, अर्जुन लिंगडे, सतीश पाटील, गणपत चव्हाण आणि नंदकुमार पांढरे व माजी सैनिक तसेच नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमात वीर माता आणि वीर पत्नी यांचा विशेष सत्कारही करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांना शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. 'जय हिंद', 'शहीद अमर रहे', अशा घोषणा आणि वीर जवानांच्या स्मृतींनी वातावरण देशभक्तीमय झाले होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.