जळगाव: जामनेर शहरातील 'जैन इंटरनॅशनल स्कूल' मध्ये एका अल्पसंख्यांक समाजातील तरुणाला जातीच्या आधारे शिक्षकपद नाकारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिका फिरोजा खान यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जातीवाचक अपमान
पीडित तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार, शाळा सुरू झाल्यानंतर आठव्या दिवशी तो आपल्या नोकरीसाठी गेला असता, त्याला मी तुझी फाईल पाहिली आहे. “तू मांग समाजातील आहेस, त्यामुळे तुला नोकरी मिळणार नाही", असे म्हणत नोकरी नाकारण्यात आली. करारपत्र दाखवल्यानंतर दिवाळीनंतर येण्यास सांगण्यात आले होते, मात्र नंतर त्याच्यावर जातीवाचक टिप्पणी करण्यात आल्याचंही पीडिताने तक्रारीत म्हटलं आहे.तसेच, "तू भीक मागून खा, तुला नोकरी मिळणार नाही", असे बोलून करारपत्र फाडून टाकण्यात आले आणि "शाळेत पुन्हा दिसलास तर बघून घेईन", अशी धमकीही देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. "हा माझा आणि माझ्या समाजाचा अपमान आहे", असं म्हणत संबंधित तरुणाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
पोलिस आणि शिक्षण विभागाकडून तपास सुरू
या प्रकरणाची गंभीर दखल घेत जामनेर पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस उपअधीक्षकांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून, साक्षीदारांचे जबाब घेतले जात आहेत. लवकरच अटकेसंदर्भात निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, शिक्षण विभागानेही याप्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, सखोल चौकशी करून कारवाई केली जाईल, असे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.