तासगाव : तासगाव बस स्थानक आणि बसमध्ये मुलींची छेडछाड सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलिस प्रमुख संदीप घुगे यांना मिळताच त्यांनी तत्काळ तासगावचे पोलिस उपअधीक्षक सचिन थोरबोले यांच्याशी संपर्क साधून निर्भया पथकातील कर्मचार्यांना बसमधून प्रवास करण्याच्या आणि परिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या.
त्यामुळे आता पोलिसांची करडी नजर राहणार आहे. मंगळवारी निर्भया पथकातील सर्व पोलिसांना व पोलिस उपनिरीक्षक उपनिरीक्षक विशाल भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथकातील पोलिस कर्मचारी तुकाराम देशमुख, अक्षय वाघमारे, गणेश जाधव, महिला पोलिस कर्मचारी माधुरी सदाकळे यांनी विभागून सकाळी आठ वाजता यमगरवाडी ते तासगाव, शिरगाव बोरगाव ते तासगाव, येळावी ते तासगाव, मणेराजुरी ते तासगाव या मार्गावरील एसटी बसमधून प्रवास केला. विशेष म्हणजे निर्भया पथकातील पोलिसांनी साध्या वेषात प्रवास केला. त्यामुळे प्रवासी, विद्यार्थ्यांना निर्भया पथकातील पोलिस ओळखता आले नाहीत. काही हुल्लडबाज मुलांना तासगाव बस स्थानकात कान पकडून उठाबशा काढायला लावल्या. निर्भया पथकाच्या या कारवाईने तासगाव बस स्थानकातील प्रवासी वर्गातून स्वागत होत आहे.
या पुढील काळातही मुलींची छेडछाड करणार्यांवर पोलिस उपअधीक्षक सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले. थोरबोले म्हणाले, शहरात शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी, विद्यार्थीनी अल्पवयीन असतात. बस स्थानकावर तसेच एस टी बस मध्येही मुलींची छेडछाड करणारे इतर प्रवासीही असतात. यासाठी उपाय म्हणून निर्भया पथकाला बसमधून प्रवास करण्याचे आदेश दिले आहेत. यापुढे मुलींची छेडछाड कोणीही केली तर त्याच्यावर कारवाई करणार असल्याचा इशारा थोरबोले यांनी दिला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.