Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"हर्षल पाटीलनंतर पुढचा नंबर माझा", 'तो' मेसेज वाचून जितेंद्र आव्हाड हादरले; मुख्यमंत्र्यांना विनंती करत म्हणाले.

"हर्षल पाटीलनंतर पुढचा नंबर माझा", 'तो' मेसेज वाचून जितेंद्र आव्हाड हादरले; मुख्यमंत्र्यांना विनंती करत म्हणाले.
 

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी या गावचा रहिवासी असलेल्या कंत्राटदार हर्षल पाटील यांनी आत्महत्या केल्याचं वृत्त नुकतंच समोर आलं आहे. त्याच्या आत्महत्येवरून आता सरकारवर टीका होऊ लागली आहे. हर्षल यांनी सरकारच्या जलजीवन मिशनअंतर्गत गावांमध्ये पाणी पोहोचवण्याचं काम पूर्ण केले. मात्र, कंत्राटाचे पैसे न मिळाल्यामुळे व त्या कामासाठी घेतलेल्या कर्जामुळे हर्षल यांनी आयुष्य संपवलं आहे. यामुळे सरकारवर टीकेच झोड उठली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी समाजमाध्यमांवर एक पोस्ट लिहून हर्षल यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मात्र, त्यावर आणखी एका कंत्राटदार तरुणाची प्रतिक्रिया समोर आली आहे. ही प्रतिक्रिया वाचून जितेंद्र आव्हाड हादरले आहेत. कारण, या तरुणाने म्हटलं आहे की “कदाचित हर्षलनंतर पुढचा नंबर माझाच असेल”. तरुणाची प्रतिक्रिया आव्हाडांनी समाजमाध्यमांवर शेअर करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी काय म्हटलं होतं?
“सरकारच्या लोकप्रिय योजनांमागचं असंवेदनशील वास्तव! हर्षल पाटील - वाळवा तालुक्यातील एका मेहनती तरुणाची आत्महत्या!” या शीर्षकासह आमदार आव्हाड यांनी पोस्ट लिहिली होती. यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की हर्षल पाटील या सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातल्या तांदुळवाडी गावचा एक कष्टाळू, तरुण कंत्राटदार. त्याने सरकारच्या जलजीवन मिशनअंतर्गत गावांमध्ये पाणी पोहोचवण्याचं काम पूर्ण केलं. काम झालं, बिलं दिली, पण बिचाऱ्याला पैसे मिळालेच नाहीत! त्याची सरकारकडे १.४० कोटी रुपयांची इतकी थकबाकी होती. पैसे मिळत नाहीत म्हणून त्याने ६५ लाख रुपयांचं कर्ज काढलं आणि शेवटी आर्थिक तणावात येऊन फास घेऊन स्वतःचं आयुष्य संपवलं! पाठीमागे पत्नी, लहान मुलगी, वृद्ध आईवडील, आणि दोन लहान भाऊ…यांना ठेवून. त्याने जगाचा निरोप घेतला.”

 
“लाडकी बहीण योजना ही एक लोकप्रिय योजना असली तरी ती आर्थिकदृष्ट्या राज्याला पेलवणारी योजना नाहीये.एकीकडे या योजनेसाठी सरकारनं कोट्यवधी रुपयांचा निधी बाजूला काढला.राज्यावर कर्जाचा बोजा वाढवला. दुसरीकडे मात्र जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा खात्याशी संबंधित हजारो कंत्राटदारांनी पूर्ण केलेल्या कामांची बिलं अडवली गेली आहेत. कारण राज्य सरकारकडे ही बिलं देण्यासाठी पैसेच नाहीयेत. मी मागे म्हणालो होतो, “काही महिने जाऊ द्या… कितीतरी कंत्राटदार आत्महत्या करतील…!” दुर्दैवाने त्याची सुरुवात झाली आहे. आज हर्षल पाटील गेलाय, पण उद्या अजून किती जण या दुर्दैवी फेऱ्यात अडकतील, याची कल्पनाच न केलेली बरी.”

“हे केवळ आर्थिक संकट नाही - तर प्रशासकीय अपयश देखील आहे! निवडणुका जिंकण्यासाठी लोकांना मोफत सुविधा द्यायच्या, पण त्यामागे आवश्यक असणारा आर्थिक ताळेबंद साधायचा नाही. हर्षल पाटील यांची आत्महत्या ही केवळ एक वैयक्तिक दु:खद घटना नाही, हा एक इशारा आहे. राज्य शासन, प्रशासन आणि समाजाने ही गोष्ट गांभीर्याने घेणं गरजेचं आहे.”

“पुढचा नंबर माझा असेल”, तरुणाचा आव्हाडांना संदेश
आव्हाडांच्या या पोस्टवर एका तरुणाने प्रतिक्रिया दिली आहे. त्याने आव्हाड यांना संदेश पाठवला आहे की “आपली ही पोस्ट बघितली आणि पुढचा नंबर माझाच असेल असं वाटत आहे. मी सुद्धा सरकारी कामं केली आहेत. माझी देखील अनेक बिलं थकीत आहेत.”

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.