Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बनावट सह्या ठोकून गुपचूप नोकऱ्या; 'सार्वजनिक बांधकाम'च्या वरिष्ठ व बडतर्फ कनिष्ठ लिपिकांचा प्रताप

बनावट सह्या ठोकून गुपचूप नोकऱ्या; 'सार्वजनिक बांधकाम'च्या वरिष्ठ व बडतर्फ कनिष्ठ लिपिकांचा प्रताप
 

छत्रपती संभाजीनगर : सार्वजनिक बांधकाम विभागात गेल्या १० वर्षांत कोणतीही जाहिरात नसताना, भरती प्रक्रिया नसताना चक्क कार्यकारी अभियंत्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून ३१ जणांना शिपाई, चौकीदार व सफाई कामगार या पदांवर नियुक्त केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाचा एक वरिष्ठ लिपिक आणि एक बडतर्फ कनिष्ठ लिपिक या दोघांवर वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अंकुश श्रीरंग हिवाळे (रा. सौजन्यनगर, काल्डा कार्नर) असे वरिष्ठ लिपिकाचे, तर उज्ज्वला अनिल नरवडे (रा. सार्वजनिक बांधकाम विभाग क्वार्टर, गोपाल टी) असे बडतर्फ कनिष्ठ लिपिकाचे नाव आहे.

याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शेषराव काशीनाथ चव्हाण यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, वर्ष २०१५ ते २०२५ या कालावधीत छत्रपती संभाजीनगर, नांदेड, जालना व लातूर येथील सार्वजनिक बांधकाम व राष्ट्रीय महामार्ग विभागांतर्गत ३१ जणांना शिपाई, चौकीदार व सफाई कामगार अशा पदांवर नियुक्त करण्यात आले. या नियुक्त्यांसाठी कोणतीही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली नव्हती; ना कुठलीच अधिकृत भरती प्रक्रिया राबवली गेली.

तरीदेखील संबंधित कर्मचाऱ्यांनी कार्यकारी अभियंत्यांच्या स्कॅन केलेल्या किंवा मॉर्फिंगद्वारे तयार केलेल्या बनावट स्वाक्षऱ्यांचा वापर करत खोट्या नियुक्तीपत्रांद्वारे उमेदवारांना शासकीय सेवा मिळवून दिली. या प्रकरणी संबंधित लिपिकांकडून बडा आर्थिक व्यवहार झाल्याचा संशयही चौकशीतून पुढे आला आहे. तपास वेदांतनगर ठाण्याचे उपनिरीक्षक संतोषकुमार जोशी करीत आहेत.

पालक सेवेत नसताना अनुकंपाचा लाभ
तपासणीदरम्यान स्पष्ट झाले, की बनावट नियुक्तीपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या गेल्या असून, त्याचा उपयोग करून १२ उमेदवारांना अनुकंपा, १६ उमेदवारांना लाडपांगे शिफारशींनुसार आणि ३ उमेदवारांना सरळ सेवेद्वारे सेवेत घेतले गेले. या उमेदवारांमध्ये बहुसंख्य उमेदवारांचे पालक शासकीय सेवेत नव्हते किंवा ते नियुक्तीस पात्र नव्हते.
काही कोटींचा घोटाळा

या धक्कादायक भरतीमध्ये काही कोटी रुपयांची देवघेव झाल्याचा संशय आहे. अंकुश हिवाळे आणि उज्ज्वला नरवडे या दोघांवर गुन्हा दाखल झाला असला तरी यामागे विभागातीलच आणखी काही अधिकारीही सहभागी असावेत, असा संशय व्यक्त केला जात आहे.

जाहिरात, भरती प्रक्रिया नसतानाही भरल्या १३ जागा

वेदांतनगर ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा नोंद

पालक सेवेत नसतानाही मिळाली 'अनुकंपा'

हेच ते १३ 'लाभधारक'
चंद्रकांत दत्तू घोडके, रोहित गरबडे, ओंकार आवारे, प्रथमेश टकले, सागर शेजूळ, नितीन अंभोरे, अमोल वाघमारे, सुरेश मोरे, सुबोध हिवाळे, प्रतीका जायभाये, योगेश ठेपले, रवींद्र शेजूळ, आकाश शेळके, अंकुश ब्रह्मराक्षस, डी.आर. बनसोडे, श्रद्धा बोर्डे, उज्ज्वला नरवडे, श्रीकांत हिवाळे आदी.
चौकशी समितीपुढे कबुली

या बनावट नियुक्त्यांच्या बदल्यात संबंधितांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाला असल्याचे देखील फिर्यादीत म्हटले आहे. अनेक उमेदवारांनी चौकशी समितीपुढे आम्ही अर्ज केले नव्हते, आमचे कोणत्याही नातेवाइकाचे शासकीय सेवेशी संबंध नसल्याची शपथपत्राद्वारे कबुली दिली.

...म्हणून कपाटाला कुलूप
१५ मे २०२५ रोजी तत्कालिन कार्यकारी अभियंता अशोक येरेकर यांच्या आदेशाने एस.बी. बिहारे यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय चौकशी समिती गठीत करण्यात आली होती. समितीत प्रत्येकी तीन उपअभियंते व अतांत्रिक कर्मचारी यांचा समावेश होता. या समितीने मागील १० वर्षांतील सर्व नियुक्त्यांची कागदपत्रे तपासण्यासाठी वरिष्ठ लिपिक हिवाळे याला संबंधित नस्त्या व मूळ फाइल सादर करण्यास सांगितले. मात्र, त्याने ती सादर न करता कार्यालयीन कपाट बंद करून ठेवले. नंतर कपाटाचा पंचनामा करून कुलूप उघडल्यावर भरती प्रक्रियेची नस्ती गायब असल्याचे आढळून आले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.