एकनाथ शिंदे धास्तावले, शिवसेनेच्या माजी नगरसेवकांवर फडणवीसांचा गृहविभाग ठेवणार 'वॉच'
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून शिवसेनेत(शिंदे गटात) अनेक माजी नगरसेवक दाखल झाले. या माजी नगरसेवकांना प्रभागातील विकासकामांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.
या प्राप्त निधीतून माजी नगरसेवकांनी प्रभागासह संपर्क कार्यालयातही सीसीटीव्ही बसवले आहेत. मात्र आता एक वेगळा ट्वि्स्ट यामध्ये आला आहे. ज्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या पक्षातील माजी नगरसेवकाचं टेन्शन वाढलं आहे.
शिवसेनेच्या(शिंदे गट) माजी नगरसेवकांनी बसवलेल्या या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा कंट्रोल आता पोलिसांकडे जाणार आहे. त्यामुळे शिवसेनेचे सर्व माजी नगरसेवक व पदाधिकारी धास्तावले आहेत. कारण या माध्यमातून थेट गृहविभागाची नजर प्रभागासह माजी नगरसेवकांच्या संपर्क कार्यालयावर राहील असे बोलले जात आहे. त्यामुळे याविरोधात शिवसेनेचे पदाधिकारी पवित्रा घेऊ शकतात.
शिवसेनेच्या फुटीनंतर बहुतांश नगरसेवक हे टप्प्याटप्याने एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले. एकनाथ शिंदे हे 2024 पर्यंत मुख्यमंत्री होते, शिवाय नगरविकास खातेही त्यांच्याकडेच होते. त्यामुळे त्यांनी नगरसेवकांना गीप्ट म्हणून पहिल्या टप्प्यात 26 कोटी व दुसऱ्या टप्प्यात 25 कोटी रुपयांचा प्रभागनिहाय निधी दिला. याच निधीतून नगरसेवकांनी प्रभागाच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही मंजूर केले होते. आता हे सीसीटीव्ही आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या कंट्रोलरुमला जोडले जाणार आहे.
थेट पोलिस कंट्रोल रुमला हे सीसीटीव्ही जोडले गेल्याने नगसेवकांच्या संपर्क कार्यालयांसह प्रभागातील घडामोडींवर पोलिसांची नजर राहील. यातून शिवसेनेच्या माजी नगरसेवकांवर वॉच ठेवण्याचा गृह विभागाचा प्रयत्न असल्याचं बोललं जात असल्याने शिवसेनेचे माजी नगरसेवक व पदाधिकारी चांगलेच धास्तावले आहेत.
शहरात शिवसेनेच्या माजी नगरसेवकांना निधी दिला जात असल्याने भाजपमध्ये नाराजी पसरली होती. मात्र नगरविकास खाते हे त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याने भाजपचा नाईलाज झाला होता. मात्र आता निवडणुकीनंतर सर्व चित्र पालटलं. भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याने या निधीला ब्रेक लागला. त्यात आता फडणवीस यांच्या गृहविभागाकडून आपल्यावर वॉच ठेवला जाईल याची भिती शिवसेनेच्या माजी नगसेवकांना लागून आहे.
अद्याप या संदर्भातील प्रक्रिया सुरु झालेली नसली तरी संपूर्ण शहरात लावण्यात आलेले सीसीटीव्ही कमांड कंट्रोल सेंट्रलला जोडण्याचे प्रस्तावित असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त संदीप मिटके यांनी दिली आहे. त्यामुळे शिवसेना( शिंदे सेनेच्या) माजी नगरसेवकांची धडधड वाढली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.