सांगली :- पोलीसांवर खुनी हल्ल्याचा मोठा प्रयत्न:, चौघावर गुन्हा, चौकशीसाठी गेल्यावर हल्ला
इस्लामपूर : 'पिस्तूल घेऊन ये, पोलिसांना जिवंत ठेवायचे नाही... त्यांना गोळ्याच घालायच्या...' असे म्हणत गावगुंडांनी पोलिसांवर कोयत्याने हल्ला केल्याचा खळबळजनक प्रकार किल्लेमच्छिंद्रगड (ता.वाळवा) येथे शनिवारी रात्री घडला. या हल्ल्यात दोघे पोलिस जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. अतुल शंकर साळुंखे (वय 29), ओंकार मोहन कदम (27), कांचन शंकर साळुंखे (55), मयुरी अतुल साळुंखे (23, सर्व रा. किल्लेमच्छिंद्रगड) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. हल्ल्यात पोलिस आकाश सावंत, जालिंदर माने जखमी झाले.
इस्लामपूर पोलिस ठाण्याचे पथक बहे, नरसिंहपूर, किल्लेमच्छिंद्रगड परिसरात गस्त घालत होते. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दोघेजण दुचाकीवरून आले. त्यांनी दुचाकी थांबवली. त्यांनी सांगितले की, 'गावातील विजय साळुंखे, ओंकार कदम यांनी माझ्या वडिलाच्या डोक्याला पिस्तूल लावून दमदाटी केली व निघून गेले. तुम्ही त्यांना ताबडतोब पकडा.' त्यानंतर पोलिस किल्लेमच्छिंद्रगड येथे गेले. पोलिस जालिंदर माने, आकाश सावंत, अजय काळे पोलिस गाडीतून विजय साळुंखे याच्या घराजवळ गेले. त्यावेळी तेथे दुधाच्या किटल्या घेऊन अतुल साळुंखे उभा होता. त्याला, विजय, ओंकार कोठे आहेत, त्यांना बोलावून घे, असे पोलिसांनी सांगितले. त्यावेळी अतुल याने फोन केला... 'लवकर पिस्तूल घेऊन ये, आज पोलिसांना जिवंत ठेवायचे नाही... त्यांना गोळ्या घालायच्या... जिवंत ठेवायचे नाही', असे तो म्हणाला. त्यावेळी तेथे थोड्याच वेळात एक व्यक्ती बोलेरो गाडीतून आली.तो खाली उतरून पोलिसांच्या अंगावर गेला, शिवीगाळ करू लागला. त्यावेळी अतुलने दुचाकीस लावलेला ऊसतोडीचा कोयता घेऊन पोलिस जालिंदर यांच्यावर हल्ला केला. तो डोक्यात वार करीत असताना जालिंदर यांनी हात पुढे केल्याने हाताला जखम झाली. पोलिस आकाश हे ओंकार याच्या हातातील कोयता घेत असताना अतुल व ओंकार यांनी आकाश यांना मारहाण केली. यात आकाश यांना कोयता लागला. संशयित कांचन, मयुरी यांनी पोलिसांवर दगडफेक केली. पोलिसांनी ही माहिती वरिष्ठांना दिली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत संशयित अतुल, ओंकार, कांचन, मयुरी यांना अटक केली. रविवारी चौघांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली.
किल्लेमच्छिंद्रगड परिसर... गुन्हेगारीचा हॉट स्पॉट
किल्लेमच्छिंद्रगड... सांगली जिल्ह्यातील शेवटचे गाव. इस्लामपूर पोलिस ठाण्यापासून 25 किलोमीटरवर. कराड-इस्लामपूर पोलिस ठाण्याची हद्द. त्यामुळे गुन्हेगारांनी या परिसरात जाळे निर्माण केले आहे. गांजा तस्करी, पिस्तूल विक्री, दुचाकी चोरटे यांनी या भागात धुमाकूळ घातला आहे. मारामार्या, लूटमार तर कायमचीच. तेथील खिंडीतून रात्रीच्यावेळी जाण्याची सोयच नाही. त्यामुळे हा परिसर गुन्हेगारीचा हॉट स्पॉट बनला आहे. हद्दीवरील परिसर असल्याने कराड, इस्लामपूर पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.