सांगली : दोघांचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत २१ वर्षीय तरुणीवर जवळपास पावणेदोन वर्षांपासून लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अखेर पीडितेने सांगली शहर पोलिस ठाण्यात संशयित संदेश अनिल महापुरे (रा.मिरज) याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित तरुणी मिरज तालुक्यातील एका गावात राहते. तसेच ती होस्टेलवर राहते. संशयित संदेश महापुरे याने तिच्याशी दोन वर्षांपूर्वी ओळख करून घेऊन मैत्री वाढविली. त्यानंतर ऑक्टोबर २०२३ मध्ये तिला एकांतात बोलायचे असल्याचे सांगून सांगलीतील एका हॉटेलमध्ये बोलावून घेतले. त्याठिकाणी जबरदस्तीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.
त्यानंतर गेले पावणेदोन वर्ष त्याने अनेकदा धमकावून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पीडितेने नकार देण्याचा प्रयत्न केल्यास प्रत्येक वेळी तो होस्टेलवर येऊन दंगा करेन तसेच आपल्या दोघांचे फोटो 'व्हायरल' करीन अशा धमक्या देत होता. पीडितेने सतत बोलावे म्हणून तो मोबाइलवरून तिला मेसेज करत होता. तसेच वारंवार तिचा पाठलाग करत होता. दि. १७ जुलैपर्यंत हा त्रास सुरू होता. या त्रासाला कंटाळून पीडितेने संदेश महापुरे याच्याविरोधात फिर्याद दिली. त्यानुसार त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.